पिंपरी – करोना महामारीमुळे सुमारे दीड वर्ष शाळा ऑनलाइन सुरू होत्या. या दरम्यान नोकरदारांना “वर्क फ्रॉम होम’ही करावे लागले. यामुळे विद्यार्थ्यांसह अनेक नोकरदारांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्क फ्रॉममुळे तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे अनेकांना डोळ्याचा त्रास होत असून त्याबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.
करोना संसर्गामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचे वर्क फ्रॉम होम करावे लागले तर मुलांच्या शाळाही ऑनलाईन सुरू होत्या. मुलांनी मोबाइल, टॅबवर अभ्यास केला. त्यामुळे मुलांना आता डोळ्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत.
1 फेब्रुवारीपासून ऑफलाईन शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक लहान मुलांना आता वर्गातील फळ्यावरचे दिसणे कमी झाले आहे. मुलांना मोबाइलची सवय लागल्याने त्यांचा मोबाईल वापरही वाढला आहे. मोबाईलच्या रेडियशनमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांशी बोलल्यानंतर जाणवले. त्यामुळे काहींना चष्मे लागले असून, काहींच्या चष्म्यांचे नंबर वाढले आहेत.
मुलांसह, नोकरदारही चष्म्यांमुळे त्रस्त!
ऑनलाइन शाळांमुळे तीन ते चार तास मुले मोबाइलवर होती. त्यानंतर काही मुले गेम्स किंवा अन्य कार्यक्रम बघतात. मोबाइल, टॅबच्या किरणांचा बुबळावर आणि आतील पडद्यांवर परिणाम होतो. यामुळे डोळे जळजळ करणे, कोरडे होणे असे प्रकार घडतात. अशा किरणामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिड्रोम नावाचा नवीन आजारही सुरू झाला आहे.
मोतींबिदू लवकर पिकतो, अशा विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. एका दिवसात जर 50 रूग्ण नेत्र तपासणी करण्यासाठी आले तर यामध्ये 15 वर्षांखालील 30 मुले असतात. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रत्येक 20 मिनिटांनी 20 मीटर अंतरावर 20 सेंकदासाठी पाहावे, असा फार्म्युला दिला आहे. मात्र, याचे पालन होताना दिसत नाही, असे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.स्वप्निल चौधरी यांनी सांगितले.
दुष्परिणाम
* चष्मा असलेल्या मुलांचा नंबर वाढतोय
* चष्मा नसलेल्यांना चष्मा लागतोय
* मुलांसह मोठ्यांचीही एकाग्रता कमी होत आहे.
* डोळ्यांतून पाणी गळते, थकवा जाणवतो.
उपाय योजना
* मुलांनी अभ्यासाबरोबर बाहेर खेळायलाही हवे
* अधूनमधून डोळ्यांचा व्यायाम करावा
* आठ तास झोप आवश्यक
* डोळे थंड पाण्याने धुवावेत
झीरो नंबरची ब्लू रेक्ट लेन्स वापरा
आताही काही मुलांचा मोबाईल किंवा टॅबवर अभ्यास केला जात आहे. लहान मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. डोळ्यांना प्रोटेक्शन म्हणून ब्लू रेक्ट लेन्स आली आहे. तिच्यावरून रेडिएशन परावर्तित होतात व डोळ्यांना संरक्षण मिळते. चष्मा लागलेला नसला तरी, मोबाईल, लॅपटॉपवर काम करताना झिरो नंबरची ब्लू रेक्ट लेन्स वापरायला हवी. तिच्यामुळे नव्वद टक्क्यांपर्यंत डोळ्यांचे संरक्षण होते. चष्म्याशिवाय काम करताना पाच ते सहा तासात आपल्याला थकवा जाणवायला लागतो. लेन्समुळे थकवा येत नाही, असे चिंचवड येथील ऑप्टोमेट्रिस्ट वैष्णव निचित यांनी सांगितले.