धुलिवंदनासाठी विविध रंगांनी सजली बाजारपेठ

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे सामाजिक संघटनांकडून आवाहन

पर्यावरणपूरक होळी साजरी करा

भारतीय संस्कृतीत होळी व धुळवडीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, या होळीसाठी वृक्षतोड केल्याने पर्यावरणावर परिणाम होतो, तसेच धुळवडीसाठी कृत्रिम रंग वापरल्याने शरीराला विविध प्रकारच्या व्याधी जडतात. अशावेळी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन विविध संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच रंग खेळताना नैसर्गिक आणि सुक्‍या रंगाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

पिंपरी – अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या धूलिवंदन सणासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे रंग, आकर्षक पिचकाऱ्या आणि फुगे दाखल झाले असून संपूर्ण बाजारपेठच रंगीबेरंगी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

बुधवार दि. 20 मार्च होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील बाजारपेठेमध्ये होळीसाठी लागणारे साहित्य तसेच धूलिवंदनला सर्वांचे आकर्षण असलेल्या रंगाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. दुकानांमध्ये विविध प्रकारच्या रंगाबरोबरच पिचकाऱ्याही दाखल झाल्या आहेत. यावर्षी एक ते दिड लिटर रंग मावेल अशी मोठी मशिनगन असलेली पिचकारीही बच्चे कंपनीची आकर्षण ठरत आहे.

तसेच मोबाईल, बाहुल्या, बंदूक, प्राणी, पक्षी आदी प्रकारच्या पिचकाऱ्याही बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. यावर्षी, वाढलेल्या महागाईमुळे पिचकाऱ्यांच्या किमतीही वाढल्या असून किंमतींमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. लहान मुलांचे आकर्षण असलेली छोटा भीम, डोरेमोन, शिनचॅन, अर्जुन यासारखे कार्टुनच्या पिचकाऱ्यांचा भाव मोठ्या प्रमाणात आहे. या पिचकाऱ्यांसाठी 200 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत.

तसेच यावर्षी, रंगाच्या किमंतीमध्येही काहीशी वाढ झालेली पहायला मिळत असून गुलाल, गोल्डन, सिल्व्हर, पाण्याचे रंग, डबीतील रंग, खडीच्या रंगाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. विविध प्रकारचे रंग साधरणता 45 रुपयापासून 200 रुपयापर्यंत आहेत. तसेच इतर रंगही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)