घरकुल नामकरणाचा वाद चिघळला

पिंपरी– चिखलीतील घरकुल परिसराचे भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडेनगर असे नामकरण करण्याचा प्रस्तावाला रहिवाशांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होऊ लागला आहे. या कारणावरून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा स्वीय सहाय्यक राहुल याने रहिवाशांना रविवारी (दि. 27) सकाळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार रहिवाशांनी चिखली पोलीस ठाण्याला दिली आहे. या प्रकाराला सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची देखील फूस असल्याचे या तक्रार अर्जात नमूद केले आहे. या घटनेनंतर भाजपविरोधी झालेल्या घोषणांनंतर वातावरण तणावग्रस्त बनल्याने एकनाथ पवार यांनी घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांसाठी घरकुल योजना उभारली आहे. काही दिवसांपूर्वी फ प्रभाग कार्यालयांच्या बैठकीत या परिसराच्या प्रवेश कमानीवर त्याला स्व. गोपीनाथ मुंडेनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, स्थानिक रहिवाशांचा या नामकरणाला विरोध आहे. गेली आठ-दहा दिवसांपासून हा वाद धुमसत आहे. नामकरणाचे कारण पुढे करून लोकप्रतिनिधींकडून या घरकुल परिसरात जाती-धर्माचे राजकारण सुरू होण्याची शक्‍यता परिसरातील नागरिकांनी वर्तविली आहे. भविष्यातील धोका ओळखून या नामकरणाला रहिवाशांचा विरोध आहे. चिखली घरकुल योजना हे पूर्वीचे नाव कायम ठेवावे, यासाठी रहिवासी आग्रही आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फ प्रभाग कार्यालयाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर होऊनही, सत्ताधारी भाजपला मात्र, हा प्रस्ताव नागरिकांच्या गळी उतरविण्यास यश आलेले नाही. यावरून सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि रहिवाशांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा स्वीय सहाय्यक राहूल (संपूर्ण नाव व पत्ता माहित नाही) रविवारी सकाळी घरकुलमधील ए-21 हरिओम सोसायटीत आला होता. यावेळी या सोसायटीच्या आवारात उपस्थित असलेले सेवानिवृत्त लष्करी जवान रघुनाथ सावंत यांच्याशी चर्चा करताना, राहुलने त्यांना नामकरणाच्या कारणावरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याला रहिवाशांनी विरोध केला. त्यानंतर रहिवाशांच्या वतीने तातडीने चिखली पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देण्यात आले. यामध्ये या शिवीगाळीच्या प्रकाराला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांची देखील फूस असल्याचे नमूद केले आहे. तसेच सत्ताधारी भाजपकडून होत असलेल्या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी पवार यांचा स्वीय सहाय्यक राहुल याला केवळ समज न देता त्याच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
दरम्यान, या प्रकारादरम्यान सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे देखील उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांकडून होत असलेल्या भाजपविरोधी घोषणाबाजीमुळे वातावरण काहीसे तणावग्रस्त बनले. त्यामुळे राहुलसह एकनाथ पवार हे आपल्या वाहनातून निघून गेले.

“काही राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांकडून स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नामकरणाला विरोध होणे ही योग्य बाब नाही. माझ्यासोबत असलेला राहुल हा आरएसएसच्या विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. त्याच्याकडून असे कोणतेही कृत्य झालेले नाही. याउलट आम्ही दोघे जण वाहनाकडे जात असताना या कार्यकर्त्यांकडूनच शिवीगाळ व घोषणाबाजी होत होती.
– एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)