इंद्रायणी नदीपात्रात तरुण बुडाला

देहूगाव – देहूगाव येथील गाथा मंदिरामागे इंद्रायणी नदीच्या माशांच्या डोहामध्ये मद्यपानाच्या नशेत पोहायला गेलेल्या तरूण बुडाला. शनिवारी (दि. 17) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. कमलाकर माणिकराव रानडे (वय 32, सध्या रा. खालुंब्रे, ता. खेड, मुळगाव बिदर, कर्नाटक) असे नदी पात्रात बुडालेल्या तरूणाचे नाव आहे.

कमलाकर व त्याचा मित्र किरण मंगेश ठोसर (सध्या रा. खालुंब्रे, मुळगाव, जळगाव) हे शेजारी राहतात. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास कमलाकर व मंगेश हे खालुंब्रे या ठिकाणाहून लक्‍झरी बस घेऊन निघाले. त्यावेळी कमलाकर याने मद्यप्राशन केलेले होते. देहूत आल्यानंतर गाथा मंदिरालगत बस उभी करून दोघे इंद्रायणी नदी घाटावर गेले. कमलाकर नदीत पोहण्यासाठी गेला. मंगेशला पोहता येत नसल्याने तो काठावरच बसलेला होता. पोहायला गेलेला कमलाकर याला खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

मंगेश याने मदतीसाठी आरडाओरड केला. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे, दत्ता मोरे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जीवरक्षक, स्थानिक नागरिकांनी कमलाकरचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला. परंतु खोल व प्रवाही पाण्यात शोध घेण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले नाही. तसेच सर्व बचाव पथके पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेल्याने व पोलिसांकडे शोध कार्याची व्यवस्था नसल्याने बुडालेल्या तरूणाचा शोध थांबला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.