स्थायी समितीच्या अध्यक्षांचे महापौरांच्या अधिकारांवर अतिक्रमण?

वायसीएममधील बैठक वादात : प्रशासकीय बैठकीत धोरणात्मक निर्णय

पिंपरी – महापालिकेच्या प्रशासकीय बैठका घेण्याचे तसेच त्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार महापौरांनाच असताना वायसीएम रुग्णालयात स्थायी समितीच्या अध्यक्षांनी बैठक घेवून धोरणात्मक निर्णयाबाबत आदेश दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महापौरांच्या अधिकारावरील हे अतिक्रमणच असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी शनिवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात वैद्यकीय विभाग, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम आणि वायसीएममधील समस्यांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त संतोष पाटील, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्‍त मंगेश चितळे यांच्यासह सर्व डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

महापौर, स्थायी समिती अध्यक्ष “नॉट रिचेबल’

वायसीएममधील बैठक आणि धोरणात्मक बैठकीसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महापौर राहुल जाधव आणि स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघांचेही मोबाईल “नॉट रिचेबल’ होते. रात्री उशीरापर्यंत दोघांचीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

या बैठकीदरम्यान मडिगेरी यांनी रुग्णांच्या भेटीसाठी येणाऱ्यांना “व्हिजिटर्स कार्ड’ देणे, रुग्णांच्या भेटीसाठी सकाळी आणि सायंकाळच्या वेळा निश्‍चित करण्याबाबत आदेश दिले. तर शस्त्रक्रियांच्या प्रसिद्धीबाबत अधिक जागरुक होण्याच्या सूचना केल्या. तसेच रुग्णाजवळ पूर्णवेळ राहणाऱ्या नातेवाईकांसाठी “ग्रीन कार्ड’ व रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना “पिंक कार्ड’ची व्यवस्था करण्यात यावी, याबाबतचे आदेश दिले. कोणतीही प्रशासकीय सुधारणा करणे तसेच त्याबाबत आदेश देण्याचे अधिकार केवळ महापौरांना असतानाही स्थायी समिती अध्यक्षांनी केलेल्या सूचनांबाबत पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यापुढे दर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी वायसीएममधील रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठक घेणार असल्याची घोषणाही केली. अशा पद्धतीची बैठक कायदेशीर आहे की नाही? याची कोणतीही शहानिशा न करता मडिगेरींनी केलेल्या घोषणा महापौरांच्या अधिकारांवर गंडांतर आणणाऱ्या ठरणार आहेत.

स्थायीचे अध्यक्ष सूचना देऊ शकतात – पवार

महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष हे महत्त्वाचे पद आहे. वायसीएममधील सुधारणेबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष सूचना करू शकतात. त्यांनी दिलेल्या प्रशासकीय आदेशाची माहिती आपणाला नसून, दोन-तीन दिवसांपूर्वीच महापौरांसमवेत वायसीएममध्ये एक बैठक घेवून महापौरांनी प्रशासकीय सूचनांबाबत आदेश दिले होते. मडिगेरींनी घेतलेल्या बैठकीबाबत माहिती घेवून सांगतो, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

स्थायी समिती अध्यक्षांना महापालिकेच्या सर्वच विभागाच्या बैठका घेतात. मात्र त्या आर्थिक विषयाच्या असणे गरजेचे आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढ, निधी, अंदाजपत्रक, विकास कामांबरोबरच ज्या विषयामध्ये आर्थिक बाबीचा समावेश आहे त्या प्रत्येक विषयाचे अधिकार स्थायी समिती अध्यक्षांना आहेत. मात्र, प्रशासकीय बाबींचे सर्व अधिकार महापौरांना असून इतर पदाधिकारी केवळ सूचना करू शकतात, हा पालिकेचा नियम आहे, असे असताना या नियमालाच हरताळ फासला गेल्याचे बोलले जात आहे.

“वित्तीय विषयासंदर्भातील आढावा बैठक स्थायी समितीचे अध्यक्ष घेऊ शकतात. प्रशासकीय कामकाजासंदर्भात बैठका घेण्याचे अधिकार महापौरांना आहेत. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी कामकाजातील सुसूत्रतेबाबत सूचना देऊ शकतात. त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावयाची की नाही याबाबत पडताळणी करुन, निर्णय घेण्याचे अधिकार हे प्रशासनाला आहेत.
– श्रावण हर्डीकर, आयुक्‍त

Leave A Reply

Your email address will not be published.