मॉबलिचिंग विरोधात ‘मुस्लीम जमात’चे आंदोलन

पिंपरी – झारखंड मधील धतकिडीह गावात गावकऱ्यांच्या झुंडीने तबरेज अन्सारी या तरुणाला अमानुष मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. देशभरात सामूहिक हत्यांच्या (मॉब लीचिंग) वाढत्या घटनांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम जमातच्या वतीने धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरात काम करून आपले पोट भरणारा तबरेज लग्नासाठी एप्रिल महिन्यात झारखंडमधील आपल्या गावी गेला होता. लग्नानंतर पत्नीसह तो पुन्हा पुण्याला परतणार होता. दरम्यान, ईद आल्याने ईदचा सण साजरा करूनच कामासाठी जायचे त्याने ठरवले. पुण्याला जाण्यापूर्वी नातेवाईकांची भेट घेण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या तबरेजची जमावाने हत्या केली होती. तबरेज सारख्या कित्येक निरापराध लोकांचा सामूहिक मारहाणीत बळी गेला आहे. यामुळे सामाजिक शांतता धोक्‍यात आली आहे. केवळ एखाद्या विशिष्ट समुदायाचा म्हणून हे हल्ले होत नसून हे होणारे हल्ले मानवी सभ्यतेवर आहेत. अशा घटनांमुळे नव्या पिढीला चुकीचा संदेश जाण्याची शक्‍यता आहे.

तबरेज अन्सारी को इन्साफ दो, मॉब लीचिंग का आतंक रोको, लोकशाही में हुकूमशाही, नहीं चलेगी अशा फलकांद्वारे नागरिकांनी निषेध व्यक्त केला. या अत्याचाराविरोधात कठोर कायदा करावा, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. मुस्लिम जमात पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने मौलाना फैजअहमद फैजी, हाजी नसीबुल्लाहा, गफ्फार, नय्यब नूरी, कारी इकबाल, अलीम, मुफ्ती गफ्फार रजा, जावेद शेख यांच्यासह मानव कांबळे, मारूती भापकर, अल्ताफ शेख, युसूफ कुरेशी, अजहर खान, शाहाबुद्दीन शेख, रफिक कुरेशी, इम्रान बेग, जिल्लानी सय्यद, इम्रान बिजापुरे, अकिल मुजावर, आसिफ सय्यद, धम्मराज साळवे, व्ही. एम. कबिर, सलिम सय्यद, महेबूब शेख यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here