अखेर लोकशाही दिन आयोजनास पुन्हा सुरूवात

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने येत्या सोमवारी (दि.1 जुलै) लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिका मुख्यालयात मुख्य अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. उल्लेखनीय आहे की सामाजिक संघटनेने माहिती अधिकारातंर्गत याबाबत माहिती मागविण्यात आली होती. या माहितीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला लोकशाही दिनाचा विसर पडल्याचे समोर आले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे बंधनकारक असताना महापालिकेकडून मात्र याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे उघडकीस आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा महापालिकेने लोकशाही दिनाचे आयोजन सुरू केल्याचे दिसत आहे.

लोकशाही दिनामध्ये निवेदने सादर करण्यासाठी नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्‍यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्‍यक आहे. त्याकरिता नागरिकांनी प्रथम नागरी सुविधा केंद्र विभागाकडे आवश्‍यक कागदपत्रांसह लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्‍यक आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडे लोकशाही दिनाचे 15 दिवसांपूर्वी अर्जदाराकडून प्राप्त झालेले अर्ज दोन प्रतींमध्ये सादर करणे आवश्‍यक आहे. अर्ज विहित प्रक्रियेनुसार योग्य अर्जासंदर्भांत संबंधित खात्यांनी स्वीकारलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनामध्ये नागरी सुविधा केंद्र विभागाकडून टोकन प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. पुढील प्रक्रियेकरिता पाठविलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनात सुनावणी होईल. विहित नमुन्यातील निवेदने अथवा अर्ज नसल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ बाबी, राजस्व, अपील, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यातील अर्ज नसल्यास व त्या सोबत आवश्‍यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. याशिवाय अंतिम उत्तर दिलेले आहे अथवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषय संदर्भात केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.