अभियंत्यानेच लावला पाच लाखांचा चुना

मेहुण्याच्या साथीने कंपनीची रक्कम परस्पर ट्रान्सफर

पिंपरी – मेहुण्याच्या साथीने कंपनीच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करुन 5 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एका अभियंत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने तपास केल्यानंतर ही घटना समोर आली आली. ही घटना बालेवाडी येथील कन्सीसटंन्सी प्रा. लि. या “इ’ टेंडरिंग आणि ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या कंपनीत घडली.

प्रवीण विष्णुदास राठी असे अटक केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. यासह नवनीत कृष्णकुमार मेहरा (वय-27, रा. नागदा, जि. उज्जैन, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीचे मालक अजित अर्जुन कदम (वय-33, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण राठी हा काम करत असलेल्या कंपनीमध्ये ई-टेंडरिंग आणि ऑनलाइन व्यवहार केले जायचे. तसेच या कंपनीने “ऑल रिचार्ज’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले होते. या सॉफ्टवेअरमधून सर्व प्रकारचे मोबाईल तसेच डिश टिव्ही रिचार्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. हे व्यवहार करण्यासाठी बालेवाडी येथील आयसीआयसीआय बॅंकेचे खाते लिंक केलेले होते. त्यामुळे हे सर्व व्यवहार याच बॅंक खात्यामधून व्हायचे.

कंपनीमधील व्यवहार ज्या खात्यावरुन केले जायचे त्या खात्याचा पासवर्ड आणि युजरनेम हा आरोपी राठी याला माहीत होता. त्याचा गैरवापर करून त्याने त्याचा मेहुणा नवनीत याच्या बॅंक खात्यामध्ये 5 लाख 9 हजार 764 रुपये पाठवले. कंपनीच्या खात्यावरील पैसे गायब झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर अजित कदम यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे देण्यात आला. सायबर सेलने या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्याचा मेहुणा नवनीत मेहरा हा फरार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.