सेतू केंद्रातील ‘सर्व्हर डाऊन’मुळे ससेहोलपट

विद्यार्थ्यांना दाखले मिळवताना अडथळे : पिंपरी तहसील कार्यालयातील चित्र

पिंपरी – खासगी शाळा, महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरु असल्याने विविध दाखले काढण्यासाठी पिंपरी तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांचे गर्दी आहे. मात्र, तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा कार्यालयातील “सर्व्हर डाऊन’च्या समस्येने विद्यार्थ्यांना दाखले मिळविताना अडथळे निर्माण होत आहेत.

शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व, अधिवास दाखला यासारखे इतर दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ होत असल्याचे दिसत आहे. मात्र, पिंपरी तहसील कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांना विलंब लागत आहे.

दाखल्यांसाठी दररोज सुमारे 300 अर्ज

तहसील कार्यालयात ऑनलाईन दाखले काढण्यासाठी अर्जांची संख्या वाढत आहे. गेल्या महिन्याभरापासून कार्यालयात रोजचे 250 ते 300 दाखल्यांसाठी अर्ज येत आहेत. दाखल्यांची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने दाखले मिळविण्यासाठी किमान 10 दिवस लागत आहेत. दाखले मुदतीत न मिळाल्यास शाळ व महाविद्यालयातील प्रवेशास अडचणी निर्माण होण्याची भीती वाटत आहे.

ऑनलाईन अर्ज काढण्यासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या मोठी असल्याने त्याचा ताण “सर्व्हर’वर येत आहे. यामुळे, दिवसात पाच ते सहा वेळा “सर्व्हर’वर बंद पडत असल्याचा प्रकार नित्याचाच होऊन बसला आहे. या तांत्रिक अडचणीचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

“गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. सेतू केंद्रात अचानक अर्जांची संख्या वाढल्याने “सर्व्हर डाऊन’ होत आहे. मात्र, सध्या कोणताही दाखला किमान दहा दिवसात मिळत आहे. तसेच, शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना दाखले काढण्यासाठी अर्ज करताना तहसिल कार्यालयाची पोचपावती ग्राह्य धरण्याची आवश्‍यकता आहे.
-गीता गायकवाड, तहसीलदार, पिंपरी.

बहुतांश शाळा-महाविद्यालये पोचपावती नाकारतात. शैक्षणिक प्रवेश घेताना संस्था चालक विद्यार्थ्यांकडे तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी सक्ती करतात. मात्र, दाखले मुदतीत मिळत नसल्याने विद्यार्थी हताश झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यावेळी, तहसिल कार्यालयात दाखले काढण्यासाठी अर्ज करतेवेळी मिळालेली पोचपावती अर्जासोबत जोडल्यास काही महाविद्यालयात प्रवेश ग्राह्य धरत आहेत. मात्र, बहुतांश महाविद्यालयात दाखल्यांची सत्य प्रत नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे.

“गेल्या आठ दिवसांपूर्वी दाखला काढण्यासाठी कागदपत्रे जमा केली आहेत. मात्र, अद्यापही दाखला मिळाला नाही. तहसील कार्यालयातील एका दाखल्यासाठी माझा महाविद्यालयीन प्रवेश खोळंबला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात दाखला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
-प्रसन्न टाकळे, विद्यार्थी.

Leave A Reply

Your email address will not be published.