पिंपरी : भांडणाचा जाब विचारल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्यांनी एकाला लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास चिंचवड वाल्हेकरवाडीतील मातृ विद्यालयाजवळ घडली. निलेश ज्ञानेश्वर आहेर (वय 35, रा. आहेरनगर वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे जखमी इसमाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, स्वप्नील वाघमारे, किरण खवले, नाया आणि बंट्या या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास वाल्हेकरवाडीतील मातृ विद्यालयाच्या पाठीमागच्या बाजूस आरोपी भांडण करत होते. यावेळी फिर्यादी निलेश याने स्वप्नील तू भांडण का करतोस तुला काय अडचण आहे, असा जाब विचारला. यामधून वाद वाढत जाऊन चौघा आरोपींनी निलेश यास लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.शेवाळे करत आहेत.