पिंपरी-चिंचवड : रस्ते साफ-सफाईवर 776 कोटींचा खर्च

आठ वर्षांची मुदत : यांत्रिकी पद्धतीने होणार काम, 2,748 किमी रस्त्यांच्या समावेश

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने रोडस्वीपर वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येणार आहे. या कामासाठी आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीची निविदा काढण्यात येणार आहे. आठ वर्षात रस्ते साफसफाईवर महापालिका पावणे आठशे कोटी रूपये खर्च करणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी (दि.19) पार पडली.

टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा.लि. या सल्लागार संस्थेच्या वतीने शहरातील रस्ते, मंडई आणि इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याकरिता आराखडा तयार करण्यात आला. 17 जून रोजी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर आणि स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांच्या उपस्थितीत आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामध्ये शहरातील एकूण 1 हजार 292 किलोमीटर रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सहा मीटरपेक्षा कमी, 6 ते 9 मीटर, 9 ते 12 मीटर, 12 ते 18 मीटर 18 ते 24 मीटर रूंदीचे आणि महामार्ग तसेच बीआरटी रस्ते अशा स्वरूपात वर्गीकरण करण्यात आले. त्यानुसार, साफसफाई करायच्या रस्त्याची लांबी 2 हजार 748 किलोमीटर निश्‍चित करण्यात आली आहे. रस्त्याच्या घनतेनुसार तरतूद करण्यात आली असल्याबाबत टंडन अर्बन सोल्युशन्स यांनी नमूद केले आहे.

विविध आकारातील 24 रोडस्वीपर

या कामाकरिता एकूण 24 रोडस्वीपर मशीनची गरज आहे. त्यामध्ये चार अवजड रोडस्वीपर मशीन, 10 मध्यम आणि 10 लहान आकाराच्या रोडस्वीपर मशीनचा समावेश आहे. या व्यतिरिक्‍त छोट्या स्वरूपातील रस्त्यांवर साफसफाई करण्यासाठी रोडस्वीपर वाहनांसमवेत 56 लिटर पिकर्सची आवश्‍यकता आहे. हे लिटर पिकर्स शहरातील काही कंपन्यांमार्फत सीएसआर उपक्रमाअंतर्गत उपलब्ध करण्याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे. सीएसआर उपक्रमाअंतर्गत लिटर पिकर्स उपलब्ध न झाल्यास महापालिकेच्या वतीने ते खरेदी करण्याबाबत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सूचना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.