प्राथमिकच्या शिक्षकांना 8 वीचे वर्ग पेलणार का?

पालिकेच्या आणखी 15 शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंधरा शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. परंतु, या शाळांमधील शिक्षकांना आठवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्याने शिक्षक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आठवीचा अभ्यासक्रम पाहता काठिण्यपातळी आव्हानात्मक असताना दर्जेदार शिक्षकांची आवश्‍यकता आहे. मात्र, शिक्षण विभागाने प्राथमिकच्या शिक्षकांना आठवीचे वर्ग शिकविण्याचे केलेले आव्हान पेलवणार का? हा प्रश्‍न उपस्थित राहत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात प्राथमिक विभागाच्या 105 शाळा असून माध्यमिक विभागाच्या 18 शाळा आहेत. यंदाच्या वर्षापासून 15 शाळांना आठवीचे वर्ग जोडण्यात आलेले आहेत. मात्र, महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असताना नव्याने सुरु केलेल्या आठवीच्या वर्गांसाठी शिक्षकांचे नियोजन कशा पध्दतीने करायचे? असा प्रश्‍न मुख्याध्यापकांना पडला आहे. आठवीच्या वर्गाला शिकवू शकतील असे शिक्षक उपलब्ध केल्यानंतर आठवीचे वर्ग सुरु करणे आवश्‍यक होते. यंदा सुरु केलेल्या 15 शाळांमधील आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पंधरा शिक्षक नेमण्याची गरज आहे. मात्र, उपलब्ध शिक्षक कमी असल्याने प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाच आठवीच्या वर्गाचे तास घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

महापालिकेच्या काही शाळांमध्ये पालक व शाळांच्या आग्रहाने आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश शाळांमध्ये आठवीच्या वर्गांना शिकविताना शिक्षकांवर ताण जाणवणार आहे. याचबरोबर, प्रत्येक प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडे आठवीचे वर्ग शिकविण्याची क्षमता नसल्याचे अडचणी निर्माण होणार असल्याचे, मत शहरातील काही शिक्षकांनी “प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केले आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज

आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप असल्याने गुणवत्तेच्या तुलनेत विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण व शिक्षक मिळण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, बहुतांशी शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण आहे. संचमान्यता केल्यानंतर शिक्षक उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक उपलब्ध कसे करणार? असा प्रश्‍न पडत आहे. शहरातील बहुतांश प्राथमिक विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असूनही शिक्षक कमी आहेत. आता त्याच शाळांमध्ये नव्याने आठवीच्या वर्गांना शिकविताना शिक्षकांची दमछाक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.