पिंपरी – बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 3 लाख 55 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले. ही घटना दि. 1 जून ते 7 जूनच्या दरम्यान चिंचवडनगर येथे घडली. याप्रकरणी दत्तात्रय भगवान चिंचवडे (वय- 39 रा. ज्ञानदिप कॉलनी, चिंचवडेनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चिंचवडे दि. 1 जून रोजी आपले घर बंद करुन बाहेरगावी गेले होते. दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व 160.54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 5 हजार रुपये रोख असा 3 लाख 55 हजाराचा ऐवज चोरुन नेला. दि. 7 जून रोजी चिंचवडे हे घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरी झाली असल्याची फिर्याद दाखल केली. चिंचवड पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.