पिंपरी चिंचवड शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक उपक्रमांचे कॅलेण्डर

भाषा, गणित यासारख्या विषयांचा मूलभूत विकास होण्यावर भर

पिंपरी – प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड शिक्षण विभागातर्फे “नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे कॅलेंडर’ काढण्यात येणार आहे. या कॅलेंडरमध्ये भाषा, गणित यासारख्या विषयांचा मूलभूत विकास होण्यावर भर असणार आहे. याचबरोबर, दप्तपराविना शाळा, आनंददायी गृहपाठ या उपक्रममात समावेश करण्यात आला आहे. बदलत्या काळामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला असून हा उपक्रम शैक्षणिकदृष्या दिशादर्शक ठरणार आहे.

या कॅलेंडरमध्ये शासकीय सर्व ध्येयधोरणांचा सोप्या पध्दतीने समावेश केला असून शिक्षण प्रक्रिया आनंददायी, कृतीयुक्त, स्वयंप्रेरित होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्‍त ठरणार आहे. या उपक्रमाचा फायदा अप्रगत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच, शाळेतील शिक्षकांना हे कॅलेंडर मार्गदर्शक ठरणार आहे. या कॅलेंडरमध्ये वर्षभर कोणकोणते उप्रकम राबवायचे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या सोनावणे वस्ती या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला असून यंदाच्या वर्षापासून महापालिकेच्या सर्व शाळामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

“महापालिका शाळांमध्ये शैक्षणिक क्रांती करण्याचे आमचे ध्येय आहे. विविध उपक्रम राबविल्याने गुणवत्ता वाढ होत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेस चालना मिळत असून शैक्षणिक उपक्रमांचे कॅलेंडर प्रत्येक शाळेत सुरु केल्यानंतर उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे होणार आहे.
– ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी

“महापालिका विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आनंददायी उपक्रम कॅलेंडरमध्ये घेण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून 100 टक्के प्रगत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमातून प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांची सांगड घालता येणार आहे.
– रामदास मेचे, उपक्रमशील शिक्षक

दर महिन्याला अहवाल संकलन कार्यशाळा

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक शाळेत या कॅलेंडरचे वाटप करण्यात येणार आहे. यामधील, प्रत्येक उपक्रम शाळेत राबविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक शाळेने कॅलेडरमधील कोणकोणते उपक्रम राबविले याबाबत प्रत्येक माहिन्याचा माहिती अहवाल संकलन कार्यशाळेत सादर करायचा आहे. यामुळे, प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपक्रम राबविण्यात तत्पर असणार आहेत.

कॅलेंडरची ठळक वैशिष्टे

– दैनंदिन संगीतमय आदर्श परिपाठ
– राष्ट्रीय सणांचे नियोजन व कार्यवाही
– वार्षिक डिजिटल स्नेहसंमेलन
– मूल्यमापन चाचणी
– आनंददायी कृतीयुक्त गृहपाठ
– सणांची माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.