पिंपरी – पाईप लाईनचे काम पाहण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांचा पोकलेन खाली चिरडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना 30 मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सूमारास खेड तालुक्यातील खंडोबामाळ शिवे येथे घडली. महादू सिताराम सातपुते (वय-65) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार विठ्ठल रेंगडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोकलेन चालक मनोज कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, खंडोबामाळ वस्तीवर पोकलेनच्या सहाय्याने धरणातून पाईपलाईन करण्याचे काम सुरु होते. हे काम पाहण्यासाठी मयत महादू सातपुते हे गेले असता पोकलेन चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन पोकलेन मागे घेताना महादू सिताराम यांच्या अंगावर गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर पोकलेनचालक फरार झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.