यंदा वल्लभनगर आगाराची ‘लग्नसराई’ फिकी

आत्तापर्यंत ‘लालपरी’ने एकही वऱ्हाड गेले नाही : गतवर्षी होती जोरदार बुकींग

पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) वल्लभनगर आगाराला यंदा लग्नसराई मानवली नाही. संपूर्ण उन्हाळा गेला व बऱ्यापैकी लग्नाचा सीझन संपत आला आहे. तरी, अद्याप आगारातील लालपरीने कुणाचेही वऱ्हाडे गेले नसल्याने आगाराच्या अपेक्षित उत्पन्नात मोठी घट झाली आहे. गेल्यावर्षी यावेळेपर्यंत आगारात लग्नविवाहासाठी “एसटी’ बसेसची जोरात बुकींग झाली होती मात्र, यंदा एकही बुकिंग न झाल्याने वल्लभनगर आगाराला लग्नसराई मानवली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरवर्षी उन्हाळा लागला की लग्नसराई राज्य परिवहन महामंडळाचा महसूल वाढविण्यात हातभार लावते. मात्र, यावर्षी एक सुद्धा लग्नाची तारीख बुक न झाल्याने आगाराच्या तिजोरीत लग्नसराईच्या बुकींगचा एक रुपया सुद्धा जमा झाला नाही. दरवर्षी आगाराकडून शालेय, धार्मिक, सहलीसाठी विशेष नियोजन केले जाते. यातून आगाराला मोठा महसूल मिळतो. तर, शालेय विद्यार्थ्यांना महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून सवलती मिळतात व सुरक्षित प्रवास मिळतो. याच बरोबर लग्ननसराईत सुरक्षित प्रवास म्हणून महामंडळाच्या बसेसला जादा मागणी असते. राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला 56 रुपये तर,शिवशाहीला 63 रुपये पर किलीमीटर इतका दर आकारला जातो. मात्र, यंदा कडाक्‍याचा उन्हाळा असल्याने एसटी बसकडे वऱ्हाड्यांनी पाठ फिरवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

गतवर्षी 8 लाख 40 हजारांचे उत्पन्न

गेल्यावर्षी एप्रिल 2017 ते मार्च 2018 पर्यंत 8 लाख 40 हजारांचे उत्पन्न सहली व लग्नसराईतून मिळाले होते. यासाठी आगाराच्या 60 बसेस वापरण्यात आल्या होत्या. तर, एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत आगारातून एकूण 33 सहली गेल्या होत्या. यासाठी 40 बसेसने 18 हजार किलोमीटर धावल्या यातून 6 लाख 40 हजाराचे आगाराला उत्पन्न मिळाले होते. मात्र, मार्च महिन्यापासून एकही बस लग्नासाठी बुक झाली नसल्याने आगाराच्या तिजोरीतील या कमाईचा रकाना अद्याप रिकामाच आहे.

दुष्काळ कारणीभूत

उल्लेखनीय बाब अशी की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये खूप मोठ्या संख्येने मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील नागरिकांचे वास्तव्य आहे. नोकरीसाठी शहरात येऊन स्थायिक झालेला हा वर्ग दरवर्षी लग्न व इतर समारंभासाठी गावी जात असतो. विशेषतः मराठवाड्यामध्ये बहुतेक लग्नेही उन्हाळ्यातच होत असतात. यंदा हे तीनही भाग दुष्काळाच्या प्रचंड झळा सोसत आहेत. त्यामुळे यावर्षी जास्त लग्ने झाली नाहीत. जे विवाह समारंभ झाले तेही साध्या पद्धतीने उरकण्यात आले आणि जास्त खर्च करण्याचे नागरिकांनी टाळले. बहुतांशी शहरातून वऱ्हाड घेऊन गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांनी देखील संपूर्ण बस बुक न करता थोडी थोडकीच मंडळी गावाकडे पोहचली.

Leave A Reply

Your email address will not be published.