अनधिकृत बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी दहा लाखांची खंडणी
पिंपरी – अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेने दहा लाखांची खंडणी मागितली. तसेच या महिलेचे पैसे देऊन विषय संपवून टाक, नाहीतर तुझे काही खरे नाही, अशी धमकी तिच्या सहकाऱ्याने दिली. हा प्रकार शुक्रवार दि.14 जून रोजी पिंपरी येथे उघडकीस आला आहे.
या प्रकरणी गिरीश सुरेश सचदेव (वय 35, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगीता शहा आणि तिच्या एका अज्ञात साथीदाराविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता शहा या महिलेने फिर्यादी गिरीश सचदेव यांना फोन करून तुमच्या अनधिकृत बांधकामाबाबत मी महापालिकेकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी मला पाच ते दहा लाख रूपये दे, तरच मी तक्रार मागे घेईन, अशी धमकी दिली. तर मागच्या आठवड्यात याच कारणावरुन एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी गिरीश सचदेव यांच्या दुकानात जाऊन तू संगीता शहा यांना पैसे देऊन विषय संपवून टाक, नाही तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी दिली.
या प्रकरणात सचदेव यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहे.