पिंपरी – महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कार्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत झालेल्या वादातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. हल्लेखोरांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
देवेंद्र बीडलांन व सॅमसंग (रा. दोघेही, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील साने चौकातील कार्यालयाची पाच ते सात जणांनी तोडफोड केली होती. हातात शस्त्र घेवून हल्लेखोरांनी तोडफोड केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. भरदिवसा हल्ला झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण होते. हल्लेखोरांचे सिसिटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेवून दोघांना अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.