पावसाची चाहूल लागताच कांदा महागला

व्यापाऱ्यांची चांदी : चार दिवसांत 10 रुपयांनी काद्यांचे भाव वाढले

पिंपरी – गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यभरात मान्सूनपूर्व पडत असलेल्या पावसामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्याकडील कांदा संपत आल्याने व पावसामुळे वखारात साठवून ठेवण्यात आलेला कांदा सुरक्षित ठिकाणी साठवला जात असल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. यामुळे कांद्याच्या भावात अचानक तेजी आली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

चार दिवसांपूर्वी 6 ते 7 रुपयांनी विकला जाणारा कांदा आता चक्क 10 रुपयांनी वाढला असल्याने नागरिकांना कांद्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे.

राज्यभरात मान्सूनपूर्व पडत असलेल्या पावसामुळे कांद्याचे भाव अचानक वाढले आहे. तर, बाजारात येणारा शेतकऱ्यांचा कांदा कमी झाला असल्याने कांदा भाव खाताना दिसत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. चार दिवसांपूर्वी 50 किलोचे पोते 300 ते 350 रुपयांपर्यंत विकले जात होते. मात्र, त्याच पोत्याला आता सुमारे 700 रुपये मोजावे लागत आहे. उन्हाळ्यात कांदा खराब होणार नाही यासाठी शेतकरी मोकळ्या जागेत वखारी तयार करुन त्यात कांदा ठेवतात. मात्र, पावसाळा आल्यावर कांद्याला सुरक्षित पाऊस लागणार नाही, अशा ठिकाणी ठेवण्यात येते. यामुळे बाजारात दैनंदिन विक्रीसाठी येणारा कांदा कमी झाला आहे. याचा परिणाम थेट कांद्याच्या भावावर झाला आहे.

राज्यात दुष्काळ सदृश्‍य परिस्थिती असल्याने नवीन उत्पादित होणारा कांदासुद्धा लवकर येणार नसल्याने व्यापारी कांद्याची साठवणूक करुन जादा दराने कांदा विकत असल्याचे काही छोटे व्यापारी सांगत आहेत. यामुळे व्यापाऱ्याच्या कांद्याची चांदी तर, बळीराजाची मात्र पिळवणूक होताना दिसत आहे. जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो, तेव्हा कांद्याला 2 ते 3 रुपये असा अत्यल्प भाव मिळतो.

कांदा कापताना नव्हे तर विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येते आणि एकदा का शेतकऱ्याकडील कांदा संपला ही तोच कांदा व्यापारी मात्र, तिप्पट नफा मिळवून विकताना दिसत आहेत. याचा थेट फटका ग्राहकांना बसणार असून अजून काही दिवसांनी कांदा 25 रुपयांपर्यंत उच्चांक गाठेल, असा अंदाज विक्रेते व्यक्‍त करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.