पिंपरी – डिसेंबर 2018 पासून पगारीची रक्कम न देता तसेच पीएफची रक्कमही न भरता आर्थिक अफरा-तफरी केली असून ठेकेदार कंपनीसोबत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे. या सदंर्भात कामगारांनी पिंपरी पोलिसांनी लेखी तक्रार दिली आहे.
शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामध्ये स्थानकाचे काम करणाऱ्या कंपनीचे कामगार सध्या वेतन न मिळाल्यामुळे आंदोलन करत आहेत.
या कामगारांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, कामगार हे विविध राज्यातून पुण्यात मेट्रोचे काम करण्यासाठी नोव्हेंबर 2017 पासून महामेट्रोकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहेत. या कामगारांचे डिसेंबर 2018 पासून कंपनीने वेतन दिलेले नाही. वेतनाची मागणी केल्यानंतर कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी एक दोन महिन्याचे वेतन देऊन काही कामगारांना जबरदस्तीने कामावरुन काढून टाकले आहे.