गणवेशाची रक्कम खात्यात नाही : खरेदीसाठी राबवणार निविदा प्रक्रिया
पिंपरी – केंद्र शासन पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश उपलब्ध करुन दिला जातो. यासाठी, गणवेशाची थेट रोख रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात (डीबीटी) जमा केली जात होती. मात्र, यंदाच्या वर्षापासून डीबीटी जमा करण्याच्या प्रक्रियेतून शालेय विद्यार्थ्यांची “गणवेश’ ही वस्तू वगळण्यात आल्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. यामुळे, यंदा विद्यार्थ्यांचा गणवेश खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी थेट रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जात होती. यासाठी प्रती विद्यार्थ्यांना 400 रुपयांची तरतूद शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे केली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांची डीबीटी जमा करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या नावाने शून्य रुपये शिल्लक रकमेवर बचत खाते उघडण्यात आले आहे.
मात्र, बॅंकांकडून खात्यातील होणाऱ्या व्यवहारासाठी एसएमएस शुल्क, जीएसटी शुल्क, खात्यातील किमान रक्कम शुल्क अशा विविध प्रकारच्या नियमांचे पालन करणे बॅंकाकडून बंधनकारक केल्याने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे, विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याआधी गणवेश वेळेवर मिळत नसल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेण्यासाठी अनुदानाच्या स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात अडथळे निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या खात्यावरील व्यवहार होत नसल्याने बॅंकांनी कित्येक विद्यार्थ्यांची खाती बंद केली होती.
विद्यार्थ्यांची अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात डीबीटी प्रक्रियेतून सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय व क्रीडा विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांना पुरविला जाणारा “गणवेश संच’ वगळण्यात आला आहे. यामुळे, यंदाच्या वर्षी गणवेश खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.