स्थायी समितीचे माजी सभापती डब्बू आसवानी यांच्या मुलावर हल्ला

घराच्या प्रवेशद्वारावरील वाहनांचीही तोडफोड, : पूर्व वैमनस्यातून हल्ला करणाऱ्या चौघांवर गुन्हा

पिंपरी – पूर्ववैमन्यस्यातून स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या मुलावर हल्ला करत त्यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री साडेतीनच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा उर्फ बॉक्‍सर (रा. मिलिंदनगर, पिंपरी), व्यंकटेश नाईक, आदित्य साळवे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित हिरानंद आसवानी (वय 23, रा. शनिमंदिरासमोर पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित हा माजी उपमहापौर डब्बू उर्फ हिरानंद आसवाणी यांचा मुलगा आहे. अमित रविवारी रात्री व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पिंपरीतील शास्त्रीनगर येथे गेला होता. तेथून माघारी आल्यानंतर तो घराच्या गेटवर उभा असताना आरोपी हातात लोखंडी रॉड घेऊन त्या ठिकाणी आले. “आमच्या सचिन व सनी भाईच्या विरोधात तक्रार करतो का, तुम्हाला बघून घेतो, त्या डब्याला खल्लास करतो’ असे म्हणून हातातील रॉड अमितच्या दिशेने भिरकावला. यावेळी अमित याने तेथून पळ काढला. मात्र अमित पळून गेल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करीत गेटमधील वाहनांची तोडफोड केली. तसेच हातातील रॉडने गेटवरील लाकडी पट्ट्या तोडून नुकसान केले.

‘या’ वादातून हल्ला झाल्याचा संशय

25 मार्च रोजी पिंपरी कॅम्प येथे दारू खरेदीच्या कारणावरून डब्बू आसवानी आणि सचिन राकेश सौदाई (वय 33, रा. विजयनगर, काळेवाडी) यांच्यात भांडण झाले होते. या प्रकरणात डब्बू आसवाणी, लख्खू भोजवानी (वय 45) आशिष आसवानी (वय 20), अमित आसवानी (वय 19), सनी सुखेजा (वय 20), लखन सुखेजा (वय 20), भरत हिरानंद आसवाणी (वय 40, सर्व रा. पिंपरी कॅम्प) आणि सलोनी हॉटेलच्या मालकावर ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याच्या परस्पर विरोधात डब्बू आसवानी यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार सचिन राकेश सौदाई (वय 32, रा. पिंपरी), सनी राकेश सौदाई (वय 28) यांच्यासह अन्य पाच ते सात जणांवर जिवघेणा हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. या वादातूनच रविवारी डब्बू यांच्या घरावर हल्ला केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.