भोसरीतील ‘बालनगरी’ प्रकल्पाचे काम वर्षभरापासून ठप्प

दुसऱ्या अर्थसंकल्पातही निधीला ठेंगा : कुरघोडीच्या राजकारणाची भोसरीकरांमध्ये चर्चा

भोसरी – भोसरीतील बालनगरी प्रकल्पाचे काम गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे अर्धवट अवस्थेत उभ्या राहिलेल्या प्रकल्पाची आत्ताच दुरावस्था सुरू झाली आहे. निधी अभावी हा प्रकल्प कामाची मुदत उलटूनही अधांतरी आहे. यामागे भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा भोसरीकरांमध्ये रंगली आहे.

बालनगरी प्रकल्प माजी आमदार विलास लांडे यांचा “ड्रीम प्रोजेक्‍ट’ समजला जातो. त्यांच्या पत्नी तत्कालीन महापौर मोहिनी लांडे व खंदे समर्थक नगरसेवक संजय बावळे यांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यात पुढाकार घेतला होता. पिंपरी-चिंचवडला पर्यटननगरी करण्याचा संकल्प मोहिनी लांडे यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात सोडला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पर्यटन वाढीच्या दृष्टीने शहरात विविध 12 प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले होते. त्यात मोहिनी लांडे व संजय वाबळे यांच्या आग्रहास्तव बालनगरीचा समावेश करण्यात आला.

या प्रकल्पाचे भूमिपूजन 11 जुलै 2014 रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. भोसरी औद्योगिक परिसरातील आरक्षण क्रमांक 45 मध्ये सुमारे 15 एकर जागेमध्ये बालनगरी उभारण्यात येत आहे. सुमारे 48 कोटी रुपयांचा हा दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील काम 90 टक्‍के पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा सुमारे 23 कोटी रुपये खर्चाचा होता. फेब्रुवारी 2017 च्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले. भाजपच्या हाती महापालिकेची सुत्रे गेली. त्यानंतर कामाचे प्राधान्यक्रमही बदलले. राष्ट्रवादीच्या कार्यकाळातील प्रकल्पांना आडकाठी आणण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु झाला. त्याचा पहिला फटका बालनगरीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बसला.

महापालिकेच्या 2017-2018 च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाच्या तरतुदीसाठी आखडता हात घेतला. दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 50 कोटी रकमेच्या तरतुदीपैकी उर्वरीत 26 कोटींची तरतूद आवश्‍यक आहे. मात्र, प्रत्यक्षात आठ कोटींचीच तरतूद करण्यात आली. एवढेच नव्हे तर आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका अभियंत्यांची बैठक घेत बालनगरीच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतला. बालनगरीतील काही संकल्पना अनावश्‍यक आहेत. त्यावर खर्च करणे चुकीचे असल्याची भूमिका आयुक्तांनी घेतली. परिणामी, बालनगरी प्रकल्पाचे काम थंडावले.

“राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या प्रकल्पांची अडवणूक करण्याच्या राजकारणातून बालनगरी प्रकल्प रेंगाळला आहे. भोसरीच्या नावलौकीकात भर घालणारा आणि महापालिकेच्या उत्पन्नवाढीला हातभार लावणारा हा प्रकल्प आहे. महापालिका अनावश्‍यक ठिकाणी कोट्यावधींची उधळपट्टी करीत असताना बालनगरीसारख्या प्रकल्पाला आडकाठी आणण्याचा प्रकार चिंताजनक आहे.
– संजय वाबळे, स्वीकृत सदस्य, महापालिका

काम पुर्ण होण्याआधीच दुरावस्था

महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पातही बालनगरीसाठी तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प अधांतरी सापडला आहे. दुसरीकडे या प्रकल्पाची दुरावस्था झाली आहे. या प्रकल्पात मद्यपींच्या मैफली रंगतात. काचेच्या बाटल्यांचा खच बालनगरीच्या आवारात पडला आहे. याठिकाणी महापालिकेने सुरक्षा रक्षक नेमले आहेत. परंतु, मद्यपी त्यांना दाद देत नाहीत. बालनगरीच्या भिंतींचे रोडरोमियोंनी विद्रुपीकरण केले आहे. खिडक्‍यांची तावदाने फुटली आहेत. आवारात झाडे-झुडपे वाढू लागली आहेत. काम पुर्ण होण्याआधीच दुरावस्था झाल्याने करदाते नाराजी व्यक्त करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.