पिंपरी : गृहनिर्माण सोसायट्यांना मिळू लागले ‘प्रापर्टी कार्ड’

-दहा सोसायट्यांना प्रातिनिधीक स्वरूपात वाटप
-बहुतांश सोसायट्यांच्या नोंदी सातबाऱ्याला झाल्या नाहीत

पिंपरी – शहरातील 50 गृहनिर्माण सोसायट्यांची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) पिंपरी येथील नगर भूमापन कार्यालयातर्फे तयार करण्यात आले आहे. त्यातील 10 सोसायट्यांना नुकतेच प्रातिनिधीक स्वरूपात प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आले. शहरात सुमारे साडे तीन हजार गृहनिर्माण संस्था असून बहुतांश सोसायट्यांच्या नोंदी सात बाऱ्याला झालेल्या नाहीत. प्रॉपर्टी कार्ड बनण्यास सुरुवात झाल्याने सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या पिंपळे सौदागर शाखा आणि नगर भूमापन कार्यालय (पिंपरी-चिंचवड) यांच्या वतीने प्रॉपर्टी कार्ड अभियानाची मार्चमध्ये सुरवात करण्यात आली. लोकसभा निवडणुकांमुळे मध्यंतरी काही काळ हे अभियान स्थगित होते. दरम्यान, अभियानाच्या दुसऱ्या सत्रात महासंघातर्फे पिंपळेसौदागर येथील गणेश रेसीडेन्सीच्या क्‍लब हाऊसमध्ये “सहकार दरबार’ घेण्यात आला. त्यामध्ये नगर भूमापन अधिकारी शिवाजी भोसले यांच्या हस्ते गणेश रेसीडेन्सी, दि क्रेस्ट, इलेक्‍ट्रिका होम्स, साई श्री आदींसह 10 सोसायट्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. महासंघाचे वरिष्ठ संचालक सुभाष ढवळे, संचालक अनिल असगेकर, चारूहास कुलकर्णी यांच्यासह सोसायट्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. ढवळे यांच्या हस्ते याप्रसंगी सोसायट्यांच्या प्रतिनिधींना तुळशीची रोपे भेट देण्यात आली. भोसले यांना 2019 चा “एक्‍सलन्स अवॉर्ड’ नुकताच जाहीर केला आहे. त्याबद्दल त्यांचा ढवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महासंघाने प्रॉपटी कार्ड अभियान सुरू करून गृहनिर्माण संस्थांना जमिनीवर आपले नाव लाऊन घेण्याची प्रक्रिया सोपी केल्याबद्दल दी क्रेस्ट गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कटारे यांनी आभार मानले. गणेश रेसिडन्सीचे अध्यक्ष मंदार सहजे यांनी “शासन आपल्या दारी’ या घोषणेची प्रत्यक्ष प्रचिती आली, असे मत व्यक्‍त केले.

भोसले म्हणाले, “”पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने पुढाकार घेतल्याने हे अभियान राबविता येत आहे. या अभियानाबद्दल माहिती मिळाल्यानंतर अनेक गृहनिर्माण संस्था परस्पर कार्यालयात येऊन कागदपत्रे सादर करीत आहेत. त्यामुळे मिळकत पत्रिकेवर नाव लावून घेण्यासंबंधी जागृती निर्माण करण्याचा हेतू सफल होत आहे.”

तीस लाखांचा बिगरशेती सारा वसूल

“शहरात सुमारे साडेतीन हजार गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी 2 हजार गृहनिर्माण संस्था नगर भूमापन (पिंपरी-चिंचवड) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यातील बहुतांश सोसायट्यांच्या नोंदी प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबाऱ्याला झालेल्या नाही. सोसायट्यांनी प्रॉपर्टी कार्ड घ्यावे, यासाठी पिंपळेसौदागर येथील गणेश रेसीडेन्सीमध्ये यापूर्वी विविध बैठका, शिबीर घेऊन जागृती केली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सुमारे 50 गृहनिर्माण संस्थांनी नगरभूमापन कार्यालयाकडे प्रॉपर्टी कार्डसाठी अर्ज केले होते. त्यांच्या अर्जांचा निपटारा करून मिळकत पत्रिका तयार केल्या आहे. या अभियानामध्ये सोसायट्यांकडून 25 ते 30 लाख रुपयांचा बिगरशेती सारा वसूल केला आहे”, असे नगर भूमापन अधिकारी शिवाजी भोसले यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.