रमजान ईदनिमित्त खरेदीसाठी मुस्लिम समाज बांधवांची गर्दी

पिंपरी बाजारपेठेत कपडे, शेवई, सुका मेवा, अत्तर आदींची रेलचेल

पिंपरी – अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदनिमित्त विविध डिझाईनमधील कपडे, शेवई, सुका मेवा, अत्तर आदी साहित्यांनी पिंपरी बाजारपेठ गजबजू लागली आहे. मुस्लिम समाजबांधवांनी खरेदीसाठी गर्दी करू लागल्याचे चित्र पिंपरी बाजारपेठेत पहावयास मिळाले.

येत्या बुधवारी (दि. 5) ईदचा सण आहे. या सणाचा उत्साह आत्तापासूनच पाहण्यास मिळत आहे. मुस्लिम धर्मियांच्या दृष्टीने या सणाचे आगळेवेगळे महत्त्व आहे. त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यावर त्यांचा भर असतो. त्यानिमित्त घरातील अबालवृद्धांसाठी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. शिरखुर्म्याचा बेत असतो. त्यासाठी आत्तापासूनच खरेदी करण्यास सुरूवात झाली असून पिंपरी बाजारपेठेत चांगलीच गर्दी पहायला मिळत आहे.

पिंपरी बाजारपेठेत खास ईदनिमित्त पुरुषांसाठी क्रॉस कुडते, क्रॉस शर्ट, साईड पट्टीवाली पॅन्ट, कोड्रा पॅन्ट, डॅमेज जीन्स, प्रिंटेड आणि रूबाब शर्ट, पट्टेवाला शर्ट आदी प्रकारातील कपड्यांना चांगली पसंती मिळत आहे. महिलांसाठी लेडीज जिन्स, पटियाला ड्रेस, गरारा, प्लाझो आदी कपडे विविध रंगसंगतीमध्ये पाहण्यास मिळत आहेत. मुलांसाठी साईड पट्टीच्या, डॅमेज जीन्स, चेक्‍समधील पॅन्टला चांगली मागणी होती. विशेषत: सौम्य रंगाच्या कपड्यांना मागणी आहे, अशी माहिती विक्रेते अमित सोमाणी, रघु कामठे यांनी दिली.

सुगंधित अत्तराचा दरवळ

ईदनिमित्त सुगंधित अत्तर घेण्यावर मुस्लिम बांधवांचा भर असतो. जन्नतुल फिरदौस, आसिल, आइसबर्ग, व्हाइटमुश्‍क, डिझायर असे विविध प्रकारातील अत्तरांना चांगली मागणी होती. मोगरा, गुलाब आदी फुलांच्या गंधातील अत्तरही विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचीही जोरदार खरेदी सुरू आहे.

शेवई आणि सुका मेव्याला मागणी

ईदनिमित्त केल्या जाणाऱ्या शिरखुर्म्यासाठी आवश्‍यक शेवया, सुका मेवा याला चांगली मागणी होती. तुपातील शेवई, कच्ची शेवई, दुध फेणी आदींची खरेदी करण्यात येत होती. शेवईमध्ये गणेश, लच्छा, चुंबल, बनारस अशा विविध शेवया उपलब्ध होत्या. सुका मेव्यामध्ये काजु, बदाम, मणुके, पिस्ता, अक्रोड आदींची खरेदी सुरू होती. त्याशिवाय, खारीक, खोबरे यांनाही चांगली मागणी होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.