जांभूळ, करवंदाचा हंगाम बहरला

-कोकणातून होणारी आवक वाढली
-भावही आवाक्‍यात असल्याने मागणी

पिंपरी – तुरट-गोड, गडद काळा रंग आणि गर जास्त असलेल्या जांभळाचा आणि डोंगराची मैना समजल्या जाणाऱ्या करवंदाचा हंगाम बहरला आहे. कोकणातून मार्केट यार्डात या फळांची होणारी आवक वाढली आहे. भावही अटोक्‍यात आले आहेत. घाऊक बाजारात करवंदाला किलोस दर्जानुसार 20 ते 40 रुपये, तर, जांभळाला 70 ते 120 रुपये मोजावे लागत असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

सध्या जांभळाची कोकणातून दररोज 5 ते 6 टन, कर्नाटक येथून 2 ते 3 टन, तर करवंदाची 3 ते 4 टन इतकी आवक होत आहे. पुढील काळात आवक वाढतच जाणार असल्याचे सांगून सुपेकर म्हणाले, “मेच्या मध्यावधीनंतर कोकणातून जांभूळ, करवंदाची आवक सुरू होते.

सध्या कोकणातील सावंतवाडी, महाड, रत्नागिरी, कणकवली आदी परिसरातून जांभूळ आणि करवंदे बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून मालाचा दर्जाही थोडासा खालावला आहे. सध्या मिळत असलेले भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 20 टक्के कमी आहेत. कर्नाटक जांभुळ लाल दिसत असते. तर, कोकणातील काळ्या रंगाचे असते. त्यामुळे कोकणातील जांभळाला जास्त मागणी असते. कोकणातील जांभळाच्या तुलनेत गुजराती जांभूळ अधिक गोड आणि आकाराने मोठी असतात.

मात्र, गुजरात येथून होणारी जांभळाची आवक कमी झाली आहे. अत्यल्प आवक होत आहे. पुढील काळात या जांभळाचीही आवक वाढेल. कोकणातील जांभळांना पल्प तयार करणाऱ्यांकडून मोठी मागणी राहते. कोकणातील जांभळांचा हंगाम जून अखेरपर्यंत सुरू राहिल. जांभुळ हे मधुमेह रोगावर गुणकारक आहे. त्यामुळे जांभळाला असलेली मागणी अलिकडच्या काळात खूपच वाढली असल्याचेही सुपेकर यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.