पिंपरी – बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने मिळून 72 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याप्रकरणी संतोष गंगाधरराव कुंभार (वय- 35, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुवारी (दि. 31) आपले घर बंद करुन बाहेरगावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. व घरातील कपाटामध्ये ठेवलेले 12 हजार 500 रुपये किंमतीची लहान मुलीची सोन्याची चेन, 25 हजार रुपये किंमतीची सोन्याच्या वेढणी, दहा हजार रुपये किंमतीचा चांदीचा गणपती, लक्ष्मीची मुर्ती व 25 हजार रुपये रोख असा 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 31 मे रोजी संतोष हे घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याप्रकरणी भोसरी पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.