पिंपरीला गरज खमक्‍या युवा नेतृत्वाची – शेखर ओव्हाळ

एकच ध्यास, पिंपरीचा विकास : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणारच..

पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या विकासाला मागील पाच वर्षात खिळ बसली आहे. शहर मेट्रोसिटीकडे धाव घेत असताना पिंपरी विधानसभेत झोपडपट्टी पुनर्वसन, शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा, अनधिकृत बांधकाम नियमितीकरण, शास्तीकर यासारखे प्रश्‍न करदात्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न गंभीर आहे. वाढत्या महागाईने महिला वर्ग त्रस्त आहे. कायदा आणि सुव्यवस्था, अनधिकृत व्यवसाय, दहशत हे प्रश्‍न देखील पिंपरी विधानसभेत वाढले आहेत. मुलांना उच्च शिक्षणापासून मुकावे लागत आहे. हे चित्र पालटण्यासाठी पिंपरी विधानसभेला खमक्‍या युवा नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी आपण स्वतः आगामी विधानसभेच्या रणसंग्रामात उडी घेत असल्याचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीची धामधूम शांत होत नाही तोच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघातून शेखर ओव्हाळ यांचे नाव चर्चेत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून ओव्हाळ यांनी शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पिंपरी विधानसभेतील अनेक प्रश्‍नांवर प्रकाशझोत टाकला. चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघाची तुलना करता शहराचा मध्यवर्ती भाग असूनही विकास कामांच्या बाबतीत पिंपरी मतदार संघाची झालेली पिछेहाट त्यांनी सविस्तर मांडली.

झोपडपट्टी परिसराचा “मॉडेल वॉर्ड’ करुन दाखवा

शेखर ओव्हाळ पुढे म्हणाले, दापोडी ते निगडी अशा सरळ पट्ट्यात पिंपरी मतदारसंघ पसरला आहे. महापालिकेचे सात प्रभाग या मतदार संघात येतात. यामध्ये झोपडपट्टी बहुल भाग मोठ्या प्रमाणावर आहे. झोपडपट्ट्यांमध्ये देशाच्या विविध भागातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व जाती-धर्माचे लोक वास्तव्य करतात. राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकार असताना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यातून काही प्रकल्प देखील उभे राहिले. परंतु, न्यायप्रवीष्ठ बाबींमुळे हे प्रकल्प तयार होवूनही धूळखात पडून आहेत.

दुसरीकडे हक्काचे घर मिळूनही झोपडपट्टीय हालाखीचे जीवन जगत आहेत. कचऱ्याचे साम्राज्य, अस्वच्छता, रस्त्यांवरुन वाहणारे ड्रेनेजचे पाणी, अस्वच्छ व अपुऱ्या स्वरुपाचा पाणी पुरवठा, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न या झोपडपट्टी परिसरात आहेत. मात्र, मागील पाच वर्षात खुर्ची उबविण्याचे काम शिवसेनेच्या आमदारांनी केले. त्यामुळे येथील जनता आजही सोई-सुविधांसाठी टाहो फोडत आहे. या मतदार संघात एकीकडे प्राधिकरणासारखा उच्चभ्रू भाग असताना दुसरीकडे झोपडपट्टी परिसरातील विदारक परिस्थिती पाहता मतदार संघाचा समतोल विकास होणे गरजेचे आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पूर्वीच विकसित असलेला पिंपळे सौदागर सारखा भाग मॉडेल वॉर्ड म्हणून विकसित करण्यासाठी निवडला हा प्रकार अत्यंत हास्यास्पद आहे. त्याऐवजी त्यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघातील झोपटपट्टी परिसराचा समावेश असलेला प्रभाग “मॉडेल वॉर्ड’ म्हणून विकसित करुन दाखवायचा होता, तरच खरी त्यांना असलेली विकासाची चाड समोर आली असती. परंतु, सामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आपण हाणून पाडू, असा विश्‍वास शेखर ओव्हाळ यांनी व्यक्त केला.

पिंपरीतील इच्छुकांना धडकी

पुनावळे भागातील एक सक्षम राजकीय नेतृत्व म्हणून शेखर ओव्हाळ यांच्याकडे पाहिले जाते. मागील काही महिन्यांपासून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हलचाली सुरू केल्याने अन्य इच्छुकांना धडकी भरली आहे. पुनावळ्यात प्रस्तावित असलेल्या कचरा डेपोविरोधात आंदोलन केल्याने ते प्रकाश झोतात आले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून येत ओव्हाळ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

पाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना “ब’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून त्यांनी महापालिका अर्थसंकल्पावर मांडलेली मते चर्चेत आली. पुनावळे सारख्या समाविष्ट गावाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे सुरु केली होती. काळाखडक येथे जलवाहिनी टाकण्याचे काम मार्गी लावत याभागातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. पिंपरीतील विधानसभा इच्छुकांच्या यादीत शेखर ओव्हाळ हे नाव समाविष्ट झाल्याने चुरस वाढली असून इतर इच्छुकांची धडक भरली आहे.

संधी मिळूनही विकास खुंटला

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने यापूर्वी ज्यांना संधी दिली त्यांना संधीचे सोने करता आले नाही. निवडणुकीपुरती आश्‍वासने दिली गेली त्यानंतर त्याचा विसर या लोकांना पडला. शहरातील झोपडपट्टी पुर्नवसनासह अनेक प्रकल्प ज्यांनी अडचणीत आणले ते आता विकासाच्या आणाभाका घेतात ही बाबच दुर्देवी आहे. महापालिकेतही चांगल्या पदावर संधी मिळूनही पिंपरी विधानसभेसाठी एकही काम करू न शकलेले स्पर्धेत असल्याचे भासवित आहेत. जनता या लोकांना ओळखून असल्याने आपणाला नक्की विधानसभेवर काम करण्याची संधी मिळेल, असा आत्मविश्‍वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. पिंपरी मतदारसंघाचा इतरांना हेवा वाटेल, असे काम आपणाला करावयाचे आहे. जनतेच्या पाठबळावर पुढील पाच वर्षांत ते करून दाखवू. विकासाच्या मुद्यावरच आपण निवडणूक लढविणार असल्याचेही ओव्हाळ म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.