स्थानिक तरुणांना उद्योजकांकडून नकार?

बाहेरील तरुणांनाच नोकऱ्या दिल्या जात असल्याचा आरोप

पिंपरी – ‘बेरोजगारी’ ही आज देशातील सर्वांत मोठी समस्या समजली जात आहे. दुसरीकडे उद्योजक आपली मुख्य समस्या कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याची सांगत आहे. या परस्पर विरोधी परिस्थितीत स्थानिक तरुणांनी आता उद्योजक नोकरीसाठी आपल्याला प्राधान्य देत नसल्याचा आक्षेप घेतला आहे.

सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी एमआयडीसी भोसरी येथील फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयात बेरोजगार तरुणांची बैठक घेण्यात आली. बालाजीनगर, फुलेनगर येथील तरुणांनी यावेळी आपल्या व्यथा मांडल्या. देशभरात उद्योगनगरी आणि कामगारनगरी अशी ओळख असलेल्या शहरात आणि उद्योगांच्या सर्वांत जवळच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक तरुणांनाच नोकऱ्या मिळत नाहीत. याउलट राज्य आणि देशभरातून नागरीक पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन नोकऱ्या मिळवून स्थायिक होत आहेत. परंतु स्थानिक तरुणांना मात्र प्राधान्य दिले जात नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.

फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले की, औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहेत. इंडस्ट्रीजची बांधकामे व इतर स्वरूपाची कामे झोपडपट्टी परिसरातील तरुणांकडून करून घेतली जातात. परंतु कंपन्यांमध्ये परिसरातील युवकांना कामाला ठेवण्यासाठी नकारात्मक प्रतिसाद कायम असतो. बाहेरील तरुणांना नोकरी दिली जाते आणि स्थानिक तरुणांना नाकारले जाते उद्योजकांनी ही मानसिकता बदलायला हवी. परिसरात राहणारे सर्वच तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसतात. यामध्ये अनेक उच्चशिक्षित व कुशल तरुण आहेत. जर या तरुणांना चालना दिली तर मोठ्या प्रमाणात परिसरात बदल घडू शकतो व उद्योगांना भेडसावत असलेली कामगारांच्या अभावाची समस्यादेखील सुटू शकते.

भोर पुढे म्हणाले की, या वस्तीतील तरुणांवर आरोप केले जातात. आता हे तरुणच औद्योगिक परिसराच्या सुरक्षेसाठी पुढे येण्यास तयार झालेले आहेत. त्याला सर्व उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी साथ दिल्यास नवीन संकल्पना पुढे येण्यास वेळ लागणार नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, याबाबत काही उद्योजकांसोबत चर्चा केली असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कंपन्यांच्या सीएसआर निधी मार्फत या तरुणांसाठी नवीन संकल्पना निर्माण करून त्यांना चालना देण्यास सर्वोपरी प्रयत्न करणार असल्याचा मानस आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजनांमार्फत या तरुण पिढीला उद्योग व्यवसायात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)