वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांना मोकळीक

बेकायदा प्रवासी वाहतूक, गणवेश, बॅचकडे दूर्लक्ष

पिंपरी – बेजबाबदार आणि निर्ढावलेल्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत पुणे पोलिसांनी रिक्षाचालकांना नियमांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक पोलिसांनी मात्र रिक्षाचालकांना खुलेआम मोकळीक दिल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. बेकायदा प्रवासी आणि गणवेश सक्ती याकडे वाहतूक पोलीस लक्ष कधी देणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात चौका-चौकात रिक्षांच्या रांगाच्या-रांगा लागलेल्या पहायला मिळतात. मात्र, त्यापैकी क्वचितच चालकांच्या अंगावर आरटीओ कार्यालयाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार गणवेश परिधान केलेला दिसून येतो. बऱ्याच रिक्षा चालकांकडे बॅच नसून ते सर्सास रिक्षा चालवत असल्याचे पहावयास मिळते.

तर, मोठ्या प्रमाणात बेकायदा प्रवाशी वाहतूक, प्रवाशांना दमदाटी, मोठ्या प्रमाणात भाडेवसुली असेच प्रकार पहावयास मिळत आहेत. चौका-चौकात उभे असलेले वाहतूूक पोलीस याप्रकाराकडे दूर्लक्ष करतात. रिक्षाचालकांची दमदाटी सुरू असताना साधी मध्यस्थी देखील करण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवित नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे.

“अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तथा वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षा चालकांवर आम्ही कारवाई करतच आहोत. मात्र, गणवेश न घालणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई संदर्भात अद्याप कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. वरिष्ठांकडून सूचना मिळाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल.

-अमर वाघमोडे, सहायक पोलीस निरिक्षक, पिंपरी वाहतूक शाखा

आरटीओ कार्यालयाच्या नियमानुसार रिक्षा चालकांना खाकी व पांढऱ्या रंगाचा गणवेश ठरवून देण्यात आला आहे. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. याचीच दखल पुणे वाहतूक विभागाने घेत नुकतीच धडक कारवाई करत गणवेश न घालणाऱ्या, बॅच नसणाऱ्या, तथा कागदपत्रे नसणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला होता.

पुणे वाहतूक पोलिसांकडून ही मोहिम कायम ठेवण्यात आलेली असताना पिंपरी-चिंचवड वाहतूक विभगाकडून अशी कोणतीही कारवाई आद्याप करण्यात आलेली नाही. पुणे वाहतूक विभागाकडून वाहतुकीबाबत अनेक निर्णय घेतले जातस असताना पिंपरी-चिंचवडचा वाहतूक विभाग मात्र सुस्तावलेला पहावयास मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापही हेल्मेट सक्ती करण्यात आलेली नाही, त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

“गणवेश व इतर कायदेशीर गोष्टींची सक्ती रिक्षा चालकांवर नक्की करावी. मात्र, त्याबरोबर त्यांना सामाजिक सुरक्षा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारने सवलती द्याव्यात. नुसते कायदे करुन कारवाईचा बडगा न उगारता त्यांच्यासाठी काही जबाबदाऱ्या स्विकाराव्यात जेणेकरुन रिक्षाचालक स्वत: कायद्याचे पालन करतील.

-बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×