प्लॅस्टिकच्या वापरामुळे पशुधन अडचणीत

पिंपरी – प्लॅस्टिकच्या पिशवीतून कचराकुंडीत टाकलेले शिळे अन्न खाताना जनावरे कचराकुंडीजवळ आढळून येतात. परंतु, अन्न खाताना जनावरांच्या शरीरात प्लास्टिकच्या पिशव्या व त्याचे लहान-लहान तुकडे जात असल्याने जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. प्लॅस्टिक बंदी असतानाही प्लॅस्टिक पिशव्यांचा होत असलेला सर्रास वापर हा पशुधनासाठी धोकायदाक ठरू लागला असून या प्रकारामुळे काही ठिकाणी जनावरे दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत.

सरकारने प्लॅस्टिक पिशव्यावर बंदी घालून त्याची प्रभावीपणे अंलमबजावणी सुरु केली. यामधून लाखो रुपयांचा दंडही वसूल केला. मात्र, कारवाई थंडावल्याने पुन्हा एकदा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरु झाला. शहरात प्लॅस्टिकच्या उघडपणे वापर होत असून कारवाईची भितीच राहिली नसल्यामुळे यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. ठिक-ठिकाणी घरगुती कचरा तसेच हॉटेल व्यावसयिक रात्रीचे शिळे अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा भरुन रस्त्यावर व कचरा पेटीत टाकत आहेत. शिळे अन्न, कचरा फेकण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचाच वापर होत आहे. विशेष म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याचा नियम असताना तो देखील पाळला जात नसल्याचे पहावयास मिळत आहे.

कचरा कुंडीत टाकण्यात आलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी या कचरा कुंड्यांशेजारी गायी, कुत्री, बैल या शिवाय इतर प्राणी जमा होतात. हे प्राणी प्लॅस्टीकसह कचरा कुंडीतील अन्न खात असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ञांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे वारंवार जनावरे दगाविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्लॅस्टिकचा वापर तात्काळ थांबवून जनावरांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका रोखावा, अशी मागणी पशुप्रेमींकडून होत आहे.

कागदी पिशव्यांचा वापर गरजेचा

जनावरांच्या पोटात गेलेली प्लॅस्टिक पिशवी शरीरातील अंतर्गत भागात चिटकून राहत असल्याने ती शस्त्रक्रिया झाल्याशिवाय काढता येत नाही. कचऱ्यामधून लोखंडी खिळे, तुकडेसुध्दा जनावरांच्या पोटात जात असल्याने जनावरांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे, नागरिकांनी शिळे अन्नपदार्थ कचरा कुंडीत टाकण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही विविध पशुप्रेमी संघटनांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.