प्रभात वॉच : ‘कि-ऑस्क’ यंत्र ‘स्वीच ऑफ’

दुरुस्तीची जबाबदारी कोणाची? : नागरिकांचा होतेयं गैरसोय

पिंपरी – नागरिकांच्या सुविधेसाठी एका बॅंकेने “सीएसआर’ उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेला दहा “कि-ऑस्क’ यंत्र भेट दिली. मात्र, त्याची दुरुस्तीची जबाबदारी घेण्यास महापालिकेने हात वर केल्याने ही यंत्र नादुरुस्ती झाली आहेत. परिणामी सर्व यंत्र बंद आहेत. ही यंत्र भंगारमालात जमा करण्याची नामुष्की ओढावली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ई-गव्हर्नन्सचा अवलंब करण्यात अव्वल ठरली आहे. सारथी प्रणालीसह विविध ई सुविधा महापालिकेने नागरिकांना देवू केल्या आहेत. याची दखल घेत एचडीएफसी बॅंकेने महापालिकेला दहा “कि-ऑस्क’ यंत्र नागरिकांच्या सुविधेसाठी मोफत दिली. 2014 साली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. मोठा गाजावाजा करुन ही यंत्र सुरू करण्यात आली. महापालिका मुख्यालय, संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) तसेच महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे यंत्र बसविण्यात आले.

“कि-ऑस्क’ यंत्र देखभालीअभावी नादुरुस्त झाली आहेत. बॅंकेने यंत्र दिली मात्र यंत्रांसाठी महापालिकेकडे ऑपरेटर नाहीत. त्यावरील दुरुस्तीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ही यंत्र वापरात आणणे अडचणीचे ठरत आहे.
– निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका.

या “टच स्क्रीन’ यंत्राद्वारे नागरिकांना शासनाचे विविध विभाग, महापालिकेच्या सुविधा, विविध प्रकारचे परवाने, दाखले आदीबाबत माहिती मिळते. तसेच नागरिकांना नागरी सुविधांबाबत यावर तक्रार देखील नोंदविता येते. या यंत्राला दुरध्वनीची सोय देखील आहे. हा दुरध्वनी महापालिकेच्या सारथी केंद्राला जोडला आहे. नागरिक त्यावर संपर्क साधून आवश्‍यक ती माहिती मिळवू शकतात. नागरिकांचा या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या यंत्रांच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले.

भेट मिळालेल्या यंत्रांवर देखभालीचा खर्च कशातून करायचा, असा प्रश्‍न उद्‌भवला. यंत्राच्या दैनंदिन चालनासाठी ऑपरेटरची नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झाले. परिणामी ही यंत्र नादुरुस्ती झाली आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कि-ऑस्कवर माहिती मिळत असल्यामुळे नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन व्हायचे. मात्र, आता त्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते.

“ब क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी सारथीची “कि-ऑस्क’ यंत्र बसविले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी असलेले हे यंत्र बंद असल्याने गैरसोय होत आहे. नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा व्हावा, त्यांना नागरी सुविधांशी संबंधित आवश्‍यक माहिती मिळावी यासाठी “कि-ऑस्क’ यंत्र सुरु करण्यात यावीत.
– करुणा चिंचवडे, नगरसेविका.

अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तरे दिली जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. काही क्षेत्रीय कार्यालयांमधील यंत्र मागील दोन-तीन वर्षांपासूनच बंद असल्यामुळे त्यांची दुरुस्ती करुन ते वापरात आणणे महापालिकेसाठी खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे ही यंत्र भंगारात जमा करण्याची वेळ आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.