एसटी बसमधून प्रथमोपचार पेट्या गायब!

“वाय फाय’ही नावालाच : अग्निशामक यंत्रणाही झाली दिसेनाशी

पिंपरी – सदैव प्रवाशांच्या सेवेत राहून “सुरक्षित प्रवासाची हमी’ घेणाऱ्या एसटी महामंडळाच्या गलथान कारभारावर नेहमीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते. एस.टी महामंडळातील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा अनेकदा प्रवाशांच्या जिवावर बेतू शकतो, हे अनेकदा सिध्द झाले आहे. दररोज शेकडो लोकांना घेऊन धावणाऱ्या अनेक बसमधून प्रथमोपचार पेट्याच गायब झाल्याचे समोर आले आहे. तसेच, आगीसारख्या संकटसमयी अत्यावश्‍यक असलेली अग्निशामक यंत्रणाही अनेक बसमधून गायब झाली आहे. त्यामुळे, सदैव प्रवाशांच्या सेवेत असणारी एसटी बस आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना कशी मदत करणार, असा प्रश्‍न सर्वसामान्य प्रवाशांपुढे पडला आहे. याशिवाय एसटीमध्ये मोठा गाजावाजा करुन बसवलेले “वायफाय’ तर केवळ नावापुरतेच उरले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या वल्लभनगर आगारातून दररोज लांब पल्ल्यांची बसेस धावत असतात. आजही एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उद्योग आणि कामगारनगरीत असलेले वल्लभनगर आगार पुणे जिल्ह्यातील इतर आगाराच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळवते. मात्र, प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्‍य घेऊन धावणाऱ्या एस.टी महामंडळाकडून प्रवाशांना सुविधा देण्यात येतात का? प्रवाशांच्या जिवाची काळजी खरच घेण्यात येते का? असा प्रश्‍न आगारातील एसटी बसकडे पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे.

एखादा अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवाशांवर तातडीने प्रथमोपचार मिळावे, यासाठी प्रत्येक एसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसवण्यात आली आहे. मात्र, बहुतांश बसमधील प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. तसेच, बसमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे बधंकारक असताना अनेक बसमध्ये अग्निशमन यंत्रणाच दिसून येत नाही. त्यामुळे एसटीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सुविधा उपलब्ध करण्याकडे वल्लभनगर आगारातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता धोक्‍यात तर आली नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. महामंडळातर्फे प्रथमोपचार पेट्या बसवण्यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो. मात्र, हा खर्च पाण्यातच गेल्याचे सध्या तरी दिसत आहे.

कागदांनीच भरल्या पेट्या

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बसमधील प्रवाशांना प्रथमोपचार मिळावेत, यासाठी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. त्यात ड्रेसिंगसाठी मलम, कार्टन पट्टी आदी साहित्य असते. बसचालकाच्या कॅबिनमध्ये ही पेटी असते; परंतु अनेक बसेसमध्ये असलेल्या पेट्यांची अवस्था खराब झाली आहे. काही बसमधून पेट्याच गायब झाल्याचे दिसून येते तर काही बसमध्ये असलेल्या पेट्यांमध्ये कागद आणि इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. प्रथमोपचार पेट्या सुस्थितीत ठेवण्यासाठी महामंडळाने स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नेमण्याची गरज आहे.बसमध्ये असलेल्या या पेट्यांचा वापर अपघाताच्या वेळी करण्यात आला किंवा नाही याबाबतही फारशी माहिती महामंडळाकडे नाही. एखाद्या अपघातानंतर या पेट्यांचा वापर झाला किंवा नाही याचीही कुठलीच नोंद नाही. केवळ औपचारिकता म्हणून या पेट्या बसविण्यात आल्या आहेत, असेच एकंदरीत चित्र दिसते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.