रस्त्यावरील खोदकाम ठरतेय अपघाताचे कारण

पिंपरी – भोसरी एमआयडीसी परिसरात पाइपलाइनची कामे झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. खोदलेल्या रस्त्यावर खडी टाकून ठेवण्यात आली आहेत. यामुळे हे खोदाकाम आता अपघाताचे कारण ठरत आहे. खोदकामामुळे खस्ताहाल झालेल्या रस्त्यांवर रोजच अपघात होत असून हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी भोसरी या उद्योग परिसराची सर्वच सुविधांच्या बाबतीत अतिशय दूरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पूर्वी केलेल्या दुरुस्त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. परिसरात अवजड वाहनांची, कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्री उशिरा सुटलेले कामगार वर्ग याच रस्त्याने जात असतात, रस्त्यात करुन ठेवलेले खड्डे रात्रीच्या अंधारात न दिसल्याने दुचाकीचालकांचे अपघात वाढले आहे. अनेक खड्ड्यांमध्ये पालिकेने नुसतीच खडी पसरून ठेवली असल्याने हे खोदकाम जास्तच धोकादायक झाले आहे.

अनेक मोबाईल टॉवर कंपन्या, गॅस लाईन, जलवाहिनी व विद्युत वाहिनीसाठी अनेकदा रोड उखडण्यात आले आहेत. परंतु त्याची दुरुस्ती अद्यापपर्यंत व्यवस्थितरित्या करण्यात आलेली नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर दुरुस्ती करणे शक्‍य होत नाही. तसेच परिसरात भंगार वाहतूक करणाऱ्या गाड्या जात असतात गाड्यांमुळे रोडवर लोखंडाची बर मोठ्या प्रमाणात पडलेली असते. यामुळे देखील उन्हाळ्यात गाड्यांचे पंक्‍चर होण्याचे आणि वेगाने असलेल्या दुचाकी अचानक पंक्‍चर झाल्याने होणाऱ्या अपघातांची संख्याही वाढली आहे. महानगरपालिकेने त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.