पिंपरी (प्रतिनिधी) – पूर्ववैमनस्यातून थेरगाव-जगताप नगर येथे शुक्रवारी (दि. ५) रात्री पावणेआठच्या सुमारास तीन तरुणांनी एका २० वर्षीय तरुणाला कोयत्याने मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संबंधित तरुणाला उपचारासाठी पिंपरी- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ बालाजी गायकवाड (वय-20 वर्ष, रा. जगताप नगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांनी संबंधित तरुणाला आज थेरगाव-जगतापनगर येथे मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. आरोपी तरुण फरार झाले आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात संबंधित तीन तरुणांविरूध्द रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.