पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी येथे रविवारी झालेल्या खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. थोबाडीत मारल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गणेश थोरात (रा. जगताप चाळ, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष गुरुराज कुलकर्णी (वय 43, रा. काशिदनगर, पिंपळे गुरव) असे खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. लक्ष्मी संतोष कुलकर्णी (वय 26) यांनी रविवारी (दि. 17) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिंपळे गुरव येथील साठ फुटी रोडवर दारू पीत बसला होता. त्या वेळी मयत संतोष हा दारू पिऊन तेथे आला.
त्या वेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्या वेळी आरोपी थोरात याने मयत संतोष याच्या कानाखाली मारली. त्यामुळे चिडलेल्या संतोष याने आरोपी गणेशच्या कानाखाली मारली. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. चिडलेल्या आरोपी थोरात याने संतोष याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला.
आरोपी थोरात आणि मयत संतोष यांची ओळख नव्हती. आर्थिक कारणावरून संतोष याचा खून झाला असावा, अशी शक्यता मयत संतोष याची पत्नी लक्ष्मी हिला वाटल होते. मात्र, आरोपीला अटक केल्यावर खुनाची उकल झाली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.