पिंपरी : सांगवी येथे १६ वर्षांपूर्वी सुरक्षा रक्षकाने किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा खून केला. त्यानंतर तो ठिकठिकाणी वास्तव्य बदलून राहू लागला. अखेर १६ वर्षानंतर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने त्याला गोवा येथून अटक केली. सुनील अशोकराव कांगणे (वय ३९, रा. सुलाभट, गोवा. मूळ रा. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने सन २००९ मध्ये सुभाष सोपं धाकतोंडे (वय ५५, रा. रहाटणी) याचा खून केला होता.
पोलीस उपयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००९ मध्ये सुनील कांगणे हा सांगवी परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सुभाष धाकतोंडे यांनी त्याचा ड्युटीचा पॉइंट बदलला. या कारणावरून सुनील याने सुभाष यांचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. खून केल्यानंतर तो पळून गेला. सुनील हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आहे. खून केल्यानंतर तो त्याच्या मूळ गावी न जाता वेगवेगळ्या राज्यात जाऊन आपली ओळख लपवून राहू लागला.
मात्र पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या मागावर होते. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे यांना माहिती मिळाली की, सुनील कांगणे हा गोवा येथे राहत आहे. त्यानुसार पोलिसांचे एक पथक गोव्याला रवाना झाले. पोलिसांनी गोव्यातून सुनील याला अटक केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद गर्जे यांनी केली.