पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघाची कार्यकारिणी बरखास्त

उपनिबंधकाची प्रशासक म्हणून नेमणूक

पिंपरी – पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. तसेच कर्मचारी संघटनेचा संपूर्ण ताबा आणि सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेऊन प्रशासकांनी पुढील तीन महिन्यांत सभासदांची यादी तयार करावी, कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा असा आदेशही औद्योगिक न्यायालयाने दिला आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे खजिनदार तसेच तक्रारकर्ते अंबर किसनराव चिंचवडे यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आपण 11 जून 2018 रोजी पुण्यातील कामगार आयुक्‍तांकडे तक्रार दाखल केली होती. कामगार आयुक्तांनी 1 एप्रिल 2019 रोजी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याबाबतचे संमतीपत्र दिले. औद्योगिक न्यायालयाने महापालिका कर्मचारी महासंघावर दैनंदिन कामकाज करण्यास मनाई करुन आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याचा अंतरिम आदेश दिला होता.

या दाव्यावर 18 जुलै रोजी औद्योगिक न्यायालयाचे सदस्य एम. आर. कुंभार यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून त्यांनी कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश दिले. तसेच उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. याबाबतचा चौकशी अहवाल औद्योगिक न्यायालयाकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)