पिंपरी -मुलीच्या डोक्यावरून ट्रक गेला असून उपचारासाठी पैशांची मागणी करत सांगवी येथील एका नगरसेवकाची साडेसहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अंबरनाथ चंद्रकांत कांबळे (वय 49, रा. विनायकनगर, पिंपळेगुरव) असे फसवणूक झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. अनोळखी व्यक्तीविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांच्या मोबाइलवर फोन आला की, संबंधित व्यक्तीची मुलगी भाग्यश्री बाविस्कर हिच्या डोक्यावरून ट्रक गेला आहे. उपचारासाठी वायसीएममध्ये दाखल केले असून पैशांची गरज असल्याचे सांगितले. यावर कांबळे यांनी विश्वास ठेऊन त्यांनी आपल्या पत्नीला पैसे पाठविण्यास सांगितले.
कांबळे यांच्या पत्नीने 8329773204 व 7218175539 या नंबरवर गूगल पे द्वारे सहा हजार 500 रुपये पाठविले. त्यानंतर पुन्हा कांबळे यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली असता त्यांनी वायसीएममध्ये जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी संबंधित नावाचा रुग्ण उपचारासाठी दाखल नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले.