पिंपरी : महापालिका रुग्णालयात बेडची “लपवाछपवी’

  • नगरसेवक संदीप वाघेरे यांचा आरोप; ऑटो क्‍लस्टरमध्ये कृत्रिम टंचाई

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयांमध्ये बेडची लपवाछपवी सुरू असून, बेड रिकामे असतानाही कृत्रिम टंचाई करून रुग्णांना बेड दिले जात नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी ऑटो क्‍लस्टरमधील रिकाम्या बेडचा एक व्हिडिओही जारी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रोजच अडीच ते तीन हजार करोनाच्या रुग्णांची भर पडत आहे. महापालिकेच्या वतीने रुग्णांना सोयी सुविधा दिल्या जात आहेत. करोना रुग्णांवर उपचार व्हावेत या हेतूने महापालिकेने ऑटो क्‍लस्टर येथे 150 ओ 2 आणि 50 आयसीयू बेडचे रुग्णालय उभारले आहे. हे रुग्णालय सध्या स्पर्श हॉस्पिटल या ठेकेदाराकडून चालविले जात आहे. त्यासाठी या ठेकेदाराला दरमहा कोट्यवधी रुपये दिले जात आहेत.
भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी रविवारी (दि. 18) ऑटो क्‍लस्टर रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी एकही बेड शिल्लक नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरून आत प्रवेश केला असता धक्कादायक बाब उघडकीस आली. या रुग्णालयातील “आयसीयू’मधील 15 ते 20 आणि 20 ते 30 ओ 2 बेड रिकामे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या सर्व प्रकाराचे त्यांनी व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. एका बाजूला बेड मिळत नसल्याने करोनाचे रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वाढत असताना शिल्लक असलेले बेडही उपलब्ध करून दिले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

जाणीवपूर्वक करोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना वेठीस धरणाऱ्या ऑटो क्‍लस्टरमधील ठेकेदार तसेच या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही वाघेरे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.