पिंपरी : खासगी वैद्यकीय संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालयात निरीक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. त्याला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. २५) मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खासगी व शासकीय संस्थेतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रम, भौतिकोपचार, व्यवसायोपचार यांसारखे निमवैद्यकीय पदवी अभ्यासक्रम व परिचर्या विषयक पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी राज्य शासनाने दिलेल्या अटी शर्तींनुसार करारनामा करण्यात येणार आहे. याअंतर्गत वैद्यकीय व संबंधित क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या किंवा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अल्प दरात महापालिका रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना निरीक्षक म्हणून कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये खाजगी वैद्यकीय संस्थेत बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, एमबीबीएस, एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा, डीएनबी, डीएम, एमसीएच, एमडीएस, एमएसडब्ल्यू, एमबीए (हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन) तसेच समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
किमान १ महिना ते कमाल ६ महिने प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना महापालिकेकडे शुल्क भरावे लागणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रती खाट ३०० रुपये ( महिन्याला ९,००० रुपये) शुल्क आकारले जाईल. तर परदेशी विद्यार्थ्यांसाठी याचे तीनपट शुल्क आकारले जाईल. दरवर्षी शुल्कामध्ये १० टक्के वाढ होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना एक महिन्याचे शुल्क आगाऊ भरावे लागणार आहे.
कशी असेल प्रक्रिया?
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर रुग्णालयातील गरज व उपलब्धतेनुसार परवानगी दिली जाईल. संबंधित विद्यार्थ्यांना महापालिकेशी करार करावा लागेल. परवानगी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व इतर महापालिका रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळेल.