पिंपरी(प्रतिनिधी) – शहरामध्ये पाच क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 71 धोकादायक इमारती आहेत. त्यातील 3 इमारती या अतिधोकादायक आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने 63 धोकादायक इमारतींसाठी आत्तापर्यंत नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील 41 इमारती या नागरिकांना स्वत: पाडल्या अथवा त्यांची दुरूस्ती करून घेतली आहे.
महापालिकेच्या “अ’, “ड’, “इ’, “फ’, “ग’ या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण 71 धोकादायक इमारती आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 39 धोकादायक इमारती “ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. त्यांची किरकोळ दुरूस्ती करून घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 2 आणि “ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 1 अतिधोकादायक इमारत आहे.
महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत 63 धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत.
ज्या इमारतींची दुरुस्ती करणे शक्य आहे त्या इमारतींची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. तर, ज्या इमारतींची दुरुस्ती शक्य नाही, त्या इमारती पाडण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 41 धोकादायक इमारती नागरिकांनी स्वत: पाडल्या किंवा दुरुस्त करून घेतल्या आहेत. तर, अद्याप 30 धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही प्रलंबित आहे. “ब’, “क’ आणि “ह’ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.