मी राष्ट्रवादीसोबतच म्हणून मुंबईला निघालेले अण्णा बनसोडेंचा संपर्क नाही
शहरात चर्चेला उधाण : राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारीही अनभिज्ञ
पिंपरी – महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाने मागील दोन दिवसांत वेगळे वळण घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असलेले बहुतेक आमदार परतलेले असतानाही पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मात्र अजूनही नॉट रिचेबल आहेत. राष्ट्रवादीचे सर्व आमदार असलेल्या हॉटेलमध्येही ते परतले नाहीत आणि अजित पवारांसोबतही दिसत नसल्याने स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारापैंकी 11 आमदार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले. तर उर्वरित चौघांपैकी तिघे सोमवारी पक्षामध्ये पतरले. मात्र, सर्व आमदार परतत असताना पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मात्र कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही. आमदार बनसोडे यांनी अजित पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यात सत्तासंघर्ष टोकाला गेलेला असताना मी कायम राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच आहे, असे सांगून मुंबईला गेलेले अण्णा बनसोडे दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेनेसोबत बोलणी सुरु असताना अजित पवार यांनी अचानक भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. अचानक झालेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्था पसरलेली होती. अजित पवार यांच्या निर्णयाला शरद पवार यांचा विरोध आहे हे समजल्यानंतर शपथ विधीवेळी त्यांच्यासोबत असलेले 15 ते 16 आमदारांपैकी एक-एक आमदार निसटून पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले.
मात्र हा राजकीय ड्रामा घडत असताना पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अत्यंत सावधपणे भूमिका घेत सुरुवातीला आपण पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी आपण पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला जात आहोत, असे सांगून शहर सोडले. मात्र, ते पक्षाच्या बैठकीलाही पोहचलेच नाहीत. त्यामुळे, अण्णा बनसोडे नेमके कोठे आहेत याची शोध मोहीम सुरु आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले अहेरीचे आमदार धर्मरावबाबा अत्राम, नरहरी झिरवळ यांचा शोध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला व त्यांना पुन्हा शरद पवार यांच्याकडे आणले. मात्र पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना मात्र अद्याप शोधण्यात यश आलेले नाही. त्यामुळे ते अद्यापही अजित पवार यांच्यासोबतच असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांना साथ देणारे सर्व आमदार परतल्यामुळे आता अजित पवार यांना केवळ अण्णा बनसोडेंचीच साथ मिळाली असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले की, आपणही सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु संपर्क होत नाही. मुंबईला जातो म्हणून ते गेले आहेत.
दादांचे कट्टर समर्थक
बनसोडे हे पिंपरीतून 2009 साली निवडणूक जिंकून आमदार झाले होते. परंतु 2014 साली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. 2019 ला पुन्हा त्यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मात्र त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. पिंपरीतून नगरसेविका सुलक्षणा धर यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु अजित पवार यांनी धर यांची उमेदवारी रद्द करत अखेर अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देऊ केली. बनसोडे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. यामुळे ते अजित पवार यांनाच साथ देतील असे बोलले जात आहे. दरम्यान गायब झालेले सर्व आमदार सापडल्यानंतरही पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना मात्र शोधण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आलेले नाही. त्यामुळे, अण्णा बनसोडे यांचा शोध पिंपरी-चिंचवड मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यासोबतच राज्यभरातील कार्यकर्ते घेत असल्याचे सांगितले जात आहे.