पिंपरी एमआयडीसी परिसरातही ‘पाणीबाणी’

उद्योजक, कामगार त्रस्त : टॅंकरने पाणी मागविण्याची नामुष्की

पिंपरी – महापालिका व एमआयडीसी प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे औद्योगिक परिसराला मागील काही दिवसांपासून विस्कळीत स्वरुपाचा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे उद्योजक त्रस्त झाले असून पाण्याचे टॅंकर मागविण्याची वेळ आली आहे.

प्राधिकरण क्षेत्रात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. पेठ क्रमांक 7 व 10 या प्राधिकरणाच्या औद्योगिक पेठमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. तर एमआयडीसीच्या अन्य भागात एमआयडीसी प्रशासनाकडून पाणी पुरवठा होतो. हा पाणीपुरवठा दिवसातून फक्त एक वेळ सकाळी एकच तास केला जातो. हा परिसर उंच सखल असल्यामुळे तसेच पाणीपुरवठा पुरेश्‍या दाबाने होत नसल्यामुळे सर्व कंपन्यांना पुरेश्‍या दाबाने पाणी मिळत नाही त्यामुळे नाईलाजाने उद्योजकांना टॅंकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागते. एमआयडीसी व महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामध्ये कोणताही समन्वय नाही. जलवाहिनी फुटल्यास जलवाहिनी आमची नसल्याचे सांगत प्रशासन चालढकल करतात. पाणी टंचाईच्या तक्रारींबाबतही हाच अनुभव येत असल्याचे उद्योजक सांगतात.

या विषयी बोलताना पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, औद्योगिक परिसरात पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे अनेक उद्योगांना टॅंकरच्या पाण्याने तहान भागवावी लागते तसेच पाणीपट्टी बिलही जादा दराने भरावे लागते. हा उद्योग क्षेत्रावर अन्याय आहे. हा प्रश्‍न संघटनेने आयुक्तासोबत झालेल्या अनेक बैठकांमध्ये मांडला असून उद्योग क्षेत्राला दिवसातून किमान दोन वेळा पुरेश्‍या दाबाने किमान तीन तास तरी पाणीपुरवठा करावा, अशी आमची मागणी आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

पिण्यासाठीही व्यापारी दराने बील

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात असलेल्या कंपन्या या ऑटोमोबाइल संबंधित असून ह्या कंपन्यांना कामगारांना पिण्यासाठी व वापरासाठी पाणी लागते. या पाण्याचा व्यापारी वापर होत नाही तरीही पालिका पाणी बिलाची आकारणी व्यापारी दराने करते. 50 रुपये प्रती 1 हजार लीटर याप्रमाणे पाणी बिलाची आकारणी केली जाते. त्यातच अपुरा पाणी पुरवठा त्यामुळे बऱ्याच उद्योजकांना पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जादा दर अदा करुनही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यात टॅंकरची बीले भरण्याची वेळ आल्याने उद्योजक हैराण झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.