पिंपरी : प्रेमापुढे सर्व बंधने गळून पडतात. देश, भाषा, धर्म अशी कोणतीही बंधने प्रेम मानत नाही. सर्व अडसर दूर करत प्रेमी प्रेमाला विवाहाच्या पवित्र बंधनात बांधतात. अशी अनेक जोडपी शहरात आहेत. कित्येक महिला जगाच्या विविध देशातून शहरात लग्न करुन आल्या आहेत. शहरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने शिक्षण आणि नोकरीसाठी विविध देशांत जातात. तिथे काही जण विविध देशातील तरुण-तरुणींच्या प्रेमात पडतात. असे काही जण लग्न करुन शहरात आले आहेत. अशीच एक कहानी आहे जपानच्या मरीन मुरायामा आणि पिंपरी-चिंचवडच्या सूरज सावळे यांची.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांचे पुत्र सुरज सावळे आणि जपानच्या मरीन मुरायामा हे दोघे जर्मनीमध्ये भेटले. अगोदर ओळख, नंतर मैत्री, मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्न करून सुखी संसारात रममान झाले. व्हेलेंटाईन डे निमित्त ‘दैनिक प्रभात’ने सुरज सावळे आणि मरीन मुरायामा यांच्याशी संवाद साधला.
मरीन मुरायामा मूळच्या जपानच्या असून त्यांच्या वडिलांचे करोना काळात २०२० साली निधन झाले. त्यांची आई आणि मोठी बहीण जपानच्या एका मोठ्या विमा कंपनीत नोकरी करतात. मरीन यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून बॅले डान्सच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. आठव्या वर्षी फ्रॅंकफुर्ट विद्यापीठाने शिष्यवृत्ती दिल्याने मरीन यांनी जपानमधून जर्मनीला आल्या.
सन २०१७ मध्ये सुरज सावळे यांना जर्मनी मधील युरोपियन युनिव्हर्सिटी मधून रिन्यूएबल एनर्जी या विषयात पदवी अभ्यासक्रमासाठी निवड पत्र मिळाले. २०१९ मध्ये त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांनी अनुभव घेण्यासाठी ट्रेनी म्हणून तीन महिने एका कंपनीत काम केले. त्यानंतर त्यांनी आयटी क्षेत्रात काम सुरु केले. सुरज यांना घरच्यांकडून लग्नाबाबत वारंवार विचारणा होत होती. आई सीमा सावळे सतत विविध स्थळांचे फोटो सुरज यांना पाठवत होत्या. मात्र सुरज यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
पहिल्या भेटीतच झाले प्रेम
सुरज आणि मरीन हे दोघे त्यांच्या टर्कि येथील कॉमन मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला प्रथम भेटले. पहिल्या भेटीतच सूरज यांना मरीन मनापासून आवडल्या. दुसऱ्या एका कार्यक्रमाला दोघेजण पुन्हा एकत्र आले. त्या कार्यक्रमात त्यांचे एकमेकांशी बोलणे सुरू झाले. तिथून ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर जर्मनीतील हाऊस पार्टीमध्ये भेटल्यानंतर सुरज आणि मरीन यांची वैयक्तिक भेट सुरु झाली. तेथील राष्ट्रीय सणाच्या दिवशी दोघेजण बाहेर भेटले. दोघांना भूक लागलेली. मात्र त्या दिवशी सर्व हॉटेल्स बंद होते. त्यामुळे दोघेजण सुरज यांच्या घरी आले. सुरज यांनी स्वतः पोहे बनवून मरीन यांना दिले. ते मरीन यांना खूपच आवडले असल्याचे मरीन सांगतात.
दोन आठवड्यानंतर दिला होकार
लग्नासाठी आईच्या सतत विचारणामुळे एके दिवशी संध्याकाळी मरीन यांना घरी सोडायला चालत जात असताना सुरज यांनी धाडस करून त्यांना लग्नासाठी विचारले. त्यावर त्यांनी दोन आठवडे वेळ घेतला. दरम्यान मरीन यांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. सुरज यांचा स्वभाव, शिक्षण आणि माणूस म्हणून ते कसे आहेत, याबाबत त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. दोन आठवड्यानंतर त्यांनी लग्नासाठी होकार दिला.
मरीन यांचे मांजर प्रेम
मरीन या सुरज यांच्या कुटुंबीयांची लग्नासाठी परवानगी घेण्यासाठी भारतात आल्या. दरम्यान त्यांनी त्यांची लाडकी मांजर जर्मनीमध्येच ठेवली होती. त्या मांजरीसाठी मरीन पुन्हा जर्मनीला गेल्या. मांजरीचा पासपोर्ट बनवला. मांजरीचे तिकीट काढून स्वतंत्र आसनावर बसवून तिला भारतात आणले.
जपानी, भारतीय दोन्ही पद्धतीने विवाह सोहळा
मरीन आणि सुरज यांचा विवाह सोहळा जपानी आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने पार पडला. जपानमधील श्राईनमध्ये तर भारतीय पद्धतीने पिंपरी-चिंचवडमध्ये विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यात त्यांनी भारतीय वेशभूषा केली होती. मरीन या बॅले डान्स क्षेत्रात काम करतात. त्यासोबतच सध्या त्या संगीत, पेंटिंग, ऍनिमे देखील तयार करतात.