…तरच लोकसभेला सेनेचे काम करू! – रिपाइं

रिपाइंकडून पिंपरी विधानसभेची मागणी : बैठकीत खासदार बारणेंचे मौन

पिंपरी – मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघात आम्ही शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचे निष्ठेने काम करू; मात्र, त्या बदल्यात पिंपरी विधानसभा मतदार संघ रिपाइंला सोडावा, अशी मागणी रिपाइंच्या आठवले गटाने केली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना आणि रिपाइं पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पिंपरीत पार पडली. या बैठकीत रिपाइं पदाधिकाऱ्यांनी ही आग्रही मागणी केली. मात्र, खासदार बारणे यांनी यावर सोयीस्कर मौन बाळगले. तर आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी स्मीत हास्य करत, बोलण्याचे टाळले. यामुळे रिपाईसोबतचेही मनोमिलन अपूर्णच राहिले.

पिंपरीतील एका खासगी हॉटेलमध्ये रविवारी (दि.7) पार पडलेल्या या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, रिपाइं आठवले गटाच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब भागवत, लक्ष्मण गायकवाड, वाहतूक आघाडीचे अजिज शेख, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, सम्राट जकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे

-पिंपरी विधानसभा मतदार संघ रिपाइंला सोडावा
-रिपाइं पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी
-मित्रपक्ष या नात्याने महामंडळांवर स्थान मिळावे
-प्रचारात खासदार आठवले यांचे छायाचित्र वापरावे
-मनपा निवडणूक तिकीट वाटपात खासदारांचा सक्रीय सहभाग असावा.

भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे खासदार बारणे यांच्या प्रचारात काही केल्याने सहभागी होत नाहीत. त्यामुळे केवळ शिवसेनेच्या वतीनेच मावळ मतदार संघात प्रचार केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत राज्यकारिणीची बैठक झाली होती. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंला एकही जागा सोडली नसली, तरीदेखील भाजप-शिवसेनेचा प्रचार करण्याचा आदेश आठवले यांनी दिला आहे. त्यानंतर मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत रविवारी (दि.7) शिवसेना-रिपाइंची समन्वय बैठक पिंपरीत पार पडली.

या बैठकीत रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्‍त केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत सहकार्य करुनही, रिपाइं कार्यकर्त्यांच्या योगदानाचा शिवसेनाला विसर पडला आहे. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या आदेशानंतर, रिपाइंचे सर्व पदाधिकारी शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारांचे निष्ठेने काम करतील, मात्र पिंपरी विधानसभा मतदारसंघाबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

मनोमिलन होणार का?

सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात रिपाइंकडून चंद्रकांता सोनकांबळे यांनी निवडणूक लढविली होती. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत त्या खूपच कमी फरकाने पराभूत झाल्या होत्या. गतवेळी शिवसेना भाजपा युती विधानसभेला नव्हती मात्र भाजपासोबत रिपाइं हा पक्ष सहभागी होता. आता लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेना -भाजपा-रिपाइं अशी युती झाली आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा रिपाइंच्या वाट्याला आलाच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून शिवसेना आणि रिपाइंचे कितपत मनोमिलन होणार हा खरा प्रश्‍न आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.