- गेल्या आठवड्यात मात्र दर 46 मिनिटांना करोनाचा एक बळी
पिंपरी – तब्बल दोन महिन्यांनी सोमवारी शहरातील रुग्णसंख्येचा आकडा सहाशेपेक्षा कमी आला आहे. तसेच आजची मृतांची संख्याही दीड महिन्यांच्या तुलनेत कमी झाली आहे. सोमवारी शहरामध्ये 554 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी गेल्या आठवड्यातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा भयावह आहे. गेल्या आठवड्यात दर 46 मिनिटांना करोनाने एक बळी घेतला आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी शहरातील 554 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सलग तीन दिवस शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. शहरामध्ये 26 जुलै रोजी 493 जणांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या 800 ते 1300 यामध्ये होती.
तब्बल 64 दिवसांनी रुग्णसंख्या सहाशेच्या कमी झाली आहे. तसेच 24 तासांमध्ये 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये शहरातील 10 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 76,633 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 5617 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 941 रुग्णांचाही समावेश आहे.
सोमवारी दिवसभरात शहरात 15 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 10 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये वाकड येथील 29 वर्षीय तरुणीचाही समावेश आहे. तर शहराबाहेरील 5 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 959 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 68,255 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3654 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1591 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.