कार्ला : येथील ग्रामदेवत श्री भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरा झाला. यासह उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा देखील उत्साहात संपन्न झाला. पौष पोर्णिमेला उत्सवाची सुरुवात झाली. सकाळपासून ग्रामदेवत भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी चार वाजता देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
गावातील सुवासिनींनी पालखीचे स्वागत केले. शेवटी पालखी गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. तिथे मंदिरात पाटण, दहिवली, शिलाटणे येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर रात्री सुप्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील-मुंबईकर हिचा नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
बुधवारी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. यात अगदी शंभर रुपयापासून ते पंधरा हजार रुपयापर्यंत इनाम ठेवण्यात आले होते. गावातील मल्लांसह मावळ, मुळशी, हवेली, कर्जत, कल्याण, पुणे, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, हरियाणा येथील मल्लांनी सहभाग घेऊन कुस्त्यांमध्ये रंगत आणली.