वॉटर कप स्पर्धेत पिंपरी जलसेन राज्यात दुसरे

वॉटर कप स्पर्धेत पिंपरी जलसेन राज्यात दुसरे
पिंपरी जलसेनला 25 लाख रुपये

राज्य पातळीवर प्रथम आलेल्या सुर्डी गावाला 75 लाख रुपयाचे बक्षीस मिळाले असून, दुसऱ्या आलेल्या पिंपरी जलसेनला 25 लाखाचं बक्षीस मिळाले आहे. तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या वडनेर हवेली या गावास दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

पारनेर   – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यातून साडेचार हजारांहून अधिक गावांनी सहभाग घेतला होता. त्यात तालुक्‍यातील पिंपरी जलसेन गावाने राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच पहिल्या पंधरा गावांत वडनेर हवेलीने स्थान मिळवत तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला. सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.

वॉटर कप स्पर्धेचा निकाल पुणे येथे बालेवाडी स्टेडियम येथे जाहीर करण्यात आला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे संस्थापक अभिनेते अमीर खान, किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भाटकर, आदर्श गाव योजनेचे पोपट पवार, अजय गोगावले, अतुल गोगावले, नागराज मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील सुर्डी गावाने प्रथम क्रमांक मिळविला. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील पिंपरी जलसेन व सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील शिंदी खुर्द गावाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविले. बीड जिल्ह्यातील देवऱ्याची वाडी, जळगाव जिल्ह्यातील अनोरे व वाशीम जिल्ह्यातील बोरवा बुद्रुकने तृतीय क्रमांक मिळविला. रविवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

गावाने केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे हे पारितोषिक मिळाले असून, त्यासाठी गावाने 22 हजार घनमीटर श्रमदान, 1 लाख 59 हजार घनमीटर यंत्राने काम, 67 हजार घनमीटर एरिया ट्रीटमेंट, रोपवाटिका 950, माती परीक्षण 766, आगपेटीमुक्त शिवार 660, जलबचत 390, शोषखड्डे, परसबाग 366 आदी पाणीबचतीची कामे स्पर्धेच्या टार्गेट पेक्षा जास्त केली आहेत.
पारनेर तालुक्‍यातील वडनेर हवेली गाव तालुक्‍यातून प्रथम आले आहे. या गावाचा देखील राज्य पातळीवर पहिल्या पंधरांमध्ये क्रमांक मिळविला. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस कळमकरवाडी व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस कर्जुलेहर्या या गावास मिळाले. बक्षीस मिळाल्यानंतर पिंपरी जलसेन व वडनेर हवेली या गावांतील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here