हिंजवडी : अपंगत्वामुळे काही मुलांच्या आयुष्यात जीवन जगण्याचे रंगच बेरंगी होऊन जातात. ही दिव्यांग मुले इतर तरुणांप्रमाणे हिरिरीने सण उत्सव साजरे करत नाहीत. या पार्श्वभूमीवर या दिव्यांग मुलांच्या आयुष्यात रंगाची उधळण व्हावी, त्यांनाही इतरांप्रमाणे आनंदाने सण उत्सव साजरे करता यावेत, त्याचे मनोबल उंचवावे यासाठी हिंजवडी परिसरातील काही आयटीयन्स तरुण तरुणींनी एक अनोखी होळी साजरी केली.
या आयटीयन्सच्या टीमने माण येथील महात्मा फुले अपंग प्रशिक्षण संस्थेत व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्यासोबत धुळवड व होळीचे रंग साजरे करण्याचा अनोखा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांसोबत गप्पा गोष्टी व त्यांचा पुढील दृष्टीकोन जाणून घेत त्यांना घरून बनवून आणलेले थालीपीठ, समोसे, फरसाण, जिलेबी विद्यार्थ्यांना हाताने वाढून खाऊ घातले. सोबतच जीवनाचा उत्साह वाढविण्यासाठी विविध प्रकारचे रंग भेट दिले. यावेळी विद्यार्थ्यांना जणू काही आपले आपतेष्ट नातलग भेटल्याचा आनंद झाला होता.
या अनोख्या उपक्रमाचे आयोजन टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या (ग्लोबल हेड) सेक्रेटरी मोनिका जोशी यांनी केले होते. जोशी यांच्यासमवेत टाटा टेलिसर्व्हिसेसचे आशिष उपाध्याय, टेक् महिंद्राच्या अर्चना पुजारे, स्किलफूल पेरेन्टिंगच्या स्वरूपा मोहिते-जोशी, शितल देशमुख-वानखेडे, मुक्ता गोगटे, ड्रॉईंग आर्टिस्ट किरण शिंदे, श्रीपाद फडके, हर्षला वाणी, पूनम पवार, गोपाळ सराफ, संस्थेचे मुख्याध्यापक गणेश जगताप आदी उपस्थित होते.
या संस्थेत येणारे विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन पुढे जीवनातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील जिद्द, मेहनत, चिकाटी, परिश्रम करण्याची ऊर्जा पाहून त्यांच्यासोबत होळीचा दिवस साजरा करण्याचा प्लॅन आम्ही केला होता. या मुलांच्या सानिध्यात गेल्यामुळे आमचा सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महात्मा फुले संस्थेचे मुख्याध्यापक गणेश जगताप हे या विद्यार्थ्यांची किती छान काळजी घेतात याची प्रचिती आली.
– मोनिका जोशी (सेक्रेटरी, ग्लोबल हेड, टाटा टेक्नॉलॉजीज